वृत्तसंस्था/ हैदराबाद (तेलंगणा)
2024 च्या आयपीएल क्रिकेट हंगामासाठी सनरायर्ज हैदराबाद संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी न्यूझीलंडचे माजी अष्टपैलू डॅनियल व्हेटोरी यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा सोमवारी या संघाच्या फ्रांचायजीने केली आहे. यापूर्वी विंडीजचे माजी कर्णधार ब्रायन लारा यांच्याकडे या संघाच्या प्रमुखपदाची सूत्रे सोपविण्यात आली होती.
2020 च्या दशकामध्ये सनरायर्ज हैदराबादची आयपीएलमधील कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नाही. तत्पूर्वी हैदराबाद संघाने 2016 ते 2020 या कालावधीत आयपीएलच्या प्रत्येक हंगामात प्लेऑफ गटात प्रवेश मिळविला होता. मात्र त्यानंतर त्यांना अशी कामगिरी पुढे करता आली नाही. 2021 च्या आयपीएल हंगामात हैदराबाद संघाला गुणतक्त्यात शेवटच्या स्थानावर रहावे लागले होते. आयपीएल स्पर्धेत हैदराबाद संघाला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्यामुळे त्यांनी यापूर्वी अनेक वेळेला वारंवार प्रशिक्षकांची बदल केली होती. आयपीएलच्या 6 हंगामामध्ये हैदराबादने 4 प्रशिक्षक बदलले. 2019 आणि 2022 साली टॉम मुडी यांच्याकडे प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या कारकिर्दीत हैदराबाद संघाने 2019 साली या स्पर्धेची प्लेऑफ फेरी गाठली होती. 2022 साली आयपीएल स्पर्धेत हैदराबाद संघाला शेवटून दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. 2020-21 कालावधीत ट्रेव्हर बेलीसकडे हैदराबादचे प्रशिक्षकपद सोपविण्यात आले होते. गेल्यावर्षीच्या आयपीएल स्पर्धेत हैदराबाद संघाने 14 पैकी केवळ 4 सामने जिंकले होते. न्यूझीलंडच्या व्हेटोरीने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 113 कसोटी सामन्यात 30 धावांच्या सरासरीने 4531 धावा जमविताना 6 शतके आणि 23 अर्धशतके नोंदविली. गोलंदाजीत त्याने 362 गडी बाद केले आहेत. त्याने 295 वनडे सामन्यात फलंदाजीत 2253 धावा जमविल्या असून गोलंदाजीत त्यांने 305 बळी मिळविले आहेत. न्यूझीलंडतर्फे सर्वाधिक बळी मिळविणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत व्हिटोरी दुसऱ्या स्थानावर असून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 696 गडी बाद केले आहेत.









