वृत्तसंस्था/ गुवाहाटी
एच. एस प्रणॉय, लक्ष्य सेन आणि अश्विनी पोनप्पासारख्या दिग्गज खेळाडूंनी जागतिक कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेपूर्वी 25 सदस्यीय भारतीय संघाला प्रोत्साहन दिले आहे. प्रणॉयने याला आयुष्यात एकदाच मिळणारी संधी, असे म्हटले आहे, लक्ष्य सेनने खेळाडूंना घरच्या परिस्थितीचा फायदा घेण्याचे आवाहन केले आहे, तर अश्विनी पोनप्पाने संघाला त्यांच्या प्रशिक्षणावर विश्वास ठेवण्यास सांगितले आहे.
बीडब्ल्यूएफ वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा 6 ते 19 ऑक्टोबर दरम्यान गुवाहाटी येथे आयोजित केली जाईल. 2008 मध्ये भारताने पुण्यात या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानंतर 17 वर्षांनी भारतात ही स्पर्धा परत आली आहे. जागतिक कनिष्ठ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची ही कदाचित आयुष्यात एकदाच येणारी संधी आहे, असे 2010 मध्ये जागतिक कनिष्ठ कांस्यपदक जिंकणाऱ्या आणि तेव्हापासून भारतीय बॅडमिंटनच्या मुख्य स्टार खेळाडूंपैकी एक बनलेल्या प्रणॉयने म्हटले आहे. कनिष्ठ खेळाडूंना जगातील सर्वोत्तम खेळाडूंविऊद्ध खेळण्याची ही संधी आहे. ही पहिली पायरी आहे. येथून तुम्हाला कळेल की, पुढील काही वर्षांत काय अपेक्षा करायची आहे. कारण पुढे तुम्ही वरिष्ठ स्तरावर प्रवेश करणार आहात, असे तो पुढे म्हणाला.
भारतीय संघातील बहुतेक सदस्य अत्याधुनिक नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सराव करत आहेत आणि लक्ष्यने लक्ष केंद्रीत करण्याचे आणि शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले आहे.ठहे तुमचे घरचे मैदान आहे. घरच्या पाठिंब्याचा आणि परिस्थितीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने ही एक उत्तम स्पर्धा आहे, असे अल्मोडाच्या या 24 वर्षीय खेळाडूने सांगितले, ज्याने कनिष्ठ आणि वरिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकलेले आहे.
महिला दुहेरीतील स्टार पोनप्पाने खेळाडूंना स्वत:च्या खेळाचा आनंद घेण्याचे, त्यांच्या तयारीवर विश्वास ठेवण्याचे आणि देशासाठी शक्य तितकी पदके जिंकण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आवाहन केले आहे. भारताने जागतिक कनिष्ठ स्पर्धेत आतापर्यंत 11 पदके जिंकली आहेत, ज्यात एक सुवर्ण आणि चार रौप्यपदकांचा समावेश आहे. 2008 मध्ये सायना नेहवालने सुवर्णपदक जिंकले होते आणि आर. एम. व्ही. गुऊसाई दत्तने कांस्यपदक जिंकले होते. भारतीय संघ पहिल्यांदाच मिश्र सांघिक स्पर्धेत पदकप्राप्तीचे लक्ष्य ठेवून आहे. कारण त्यांना दुसरे मानांकन मिळाले आहे.









