Drector Subhash Bhurke Passes Away : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे संस्थापक, माजी उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष अनंत भुरके (वय ८७ नाळे कॉलनी, आयटीआय परिसर) यांचे शनिवारी पुण्यात वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांनी देहदान केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील एक ज्येष्ठ व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले.
चित्रपट दिग्दर्शक सुभाष भुरके यांनी १९५६ साली दिनकर पाटील दिग्दर्शित ‘नवरा म्हणू नये आपला’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, राजा ठाकूर यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. १९७६ साली ”सोयरिक” या चित्रपटापासून स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम सुरू केले.सौभाग्य, गाव नंबर एक यासह अन्य मराठी चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले. कथा, पटकथा, संवाद, लघुपट लेखनाबरोबरच सिने पत्रकार म्हणूनही ते कार्यरत होते. महाराष्ट्र शासनासह खासगी संस्था,उद्योग क्षेत्राच्या जाहिरातीची निर्मिती, लेखन,दिग्दर्शन केले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या स्थापनेपासून उपाध्यक्ष, कार्यवाह, सदस्य,चित्रपट महामंडळाचे पहिले घटना समितीचे सदस्य अशा विविध पदावर कार्यरत होते.कोल्हापूर चित्रनगरीचे ते पहिले चिटणीस होते.शालिनी सिनेटोन, जयप्रभा स्टुडिओसाठीच्या लढ्यात त्यांचा सहभाग होता. चित्रपट महामंडळाने त्यांचा ‘चित्रकर्मी’ पुरस्काराने गौरव केला होता. त्यांच्या जाण्याने चित्रपट क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशा प्रतिक्रिया चित्रपट,कलाकार,दिग्दर्शक निर्मात्यांकडून व्यक्त होत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीताल अष्टपैलू व्यक्तिमत्व
कथा, पटकथा, संवाद, लघुपट,सिने पत्रकार म्हणून भुरके यांनी काम केले.महाराष्ट्र शासनाच्या व इतर खासगी किंवा सार्वजनिक संस्थांच्या अनेक डॉक्युमेंटरी फिल्मची निर्मिती,दिग्दर्शन, लेखन त्यांनी केल होते.महाराष्ट्र शासनाच्या तसेच इतर उद्योगाच्या अॅडव्हटायझिंग फिल्मची निर्मिती त्यांनी केली होती. काही रेडिओ माध्यमांकरिता त्यांनी जाहिरातीचे लेखन केले. त्यातील एक श्री महालक्ष्मी दिनदर्शिकेची पहिली रेडिओ जाहिरात ‘महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे, साक्षात लक्ष्मी वसे तिथे’ ही त्याकाळी गाजली होती.








