मातब्बर नेत्याची आज जाहीर सभा
वृत्तसंस्था/ रोहतक
माजी केंद्रीय मंत्री आणि मातब्बर नेते विरेंद्र सिंह यांची राजकीय कारकीर्द पुन्हा एकदा संकटात सापडली आहे. भाजपसोबत जजपने आघाडी केल्याने विरेंद्र सिंह यांची सर्व समीकरणे बिघडली आहेत. अशा स्थितीत समर्थकांनी विरेंद्र सिंह यांना भाजप सोडण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. विरेंद्र सिंह यांची आज ‘मेरी आवाज सुनो’ सभा होणार असून यातच त्यांची पुढील राजकीय दिशा ठरणार आहे. विरेंद्र सिंह आता भाजप सोडू शकतात असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले आहे.
विरेंद्र सिंह यांनी 1977 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर उचाना कलां मतदारसंघात निवडणूक लढवत मोठ्या फरकाने विजय मिळविला होता. यानंतर 1982 मध्ये पुन्हा आमदार होत ते राज्याचे मंत्री झाले होते. 1984 मध्ये त्यांनी हिसार लोकसभा मतदारसंघात ओमप्रकाश चौताला यांना पराभूत केले होते. 1991 मध्ये ते पुन्हा आमदार झाले आणि राज्याचे महसूलमंत्री म्हणून त्यांनी काम केले. 2010 मध्ये ते राज्यसभा खासदार तर 2013 मध्ये केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री झाले होते. 29 ऑगस्ट 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने त्यांना केंद्रात मंत्रिपद दिले होते. तर 2019 मध्ये त्यांचे पुत्र बृजेंद्र सिंह हे हिसारचे खासदार म्हणून निवडून आले होते.
विरेंद्र सिंह यांचे मुख्य कार्यक्षेत्र उचाना कलां विधानसभा मतदारसंघ आहे. परंतु या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सध्या उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला करत आहेत. भाजप अन् जजप यांच्यात सध्या आघाडी आहे. विरेंद्र सिंह, त्यांचे खासदार पुत्र बृजेंद्र सिंह आणि त्यांच्या पत्नी माजी आमदार प्रेमलता यांनी वारंवार जजपसोबतची आघाडी संपुष्टात आणण्याची मागणी भाजप नेतृत्वाकडे केली आहे. भाजप-जजप आघाडी कायम राहिल्यास उचाना कलां मतदारसंघातत उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला हेच आघाडीचे उमेदवार असतील. तर प्रेमलता यांना भाजपची उमेदवारी मिळू शकणार नाही. स्वत:च्या पत्नीला उमेदवारी मिळवून देण्यासाठी विरेंद्र सिंह हे भाजपवर दबाव टाकत आहेत. भाजपकडून यासंबंधी ठोस आश्वासन न मिळाल्यास ते पक्षाला रामराम ठोकू शकतात.









