ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Veteran actor Vikram Gokhale passed away ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज दुपारी निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. मधुमेहाचा त्रास आणि जलोदर झाल्यामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मागील 17 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल गेली, आज दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने रंगभूमी, चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 4 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1947 रोजी झाला होता. अभिनेते म्हणून विक्रम गोखले यांची हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख आहे. गोखले यांनी चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून चरित्रनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच त्यांनी लेखक आणि दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला होता.
गोखले सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत भूमिका साकारत होते. काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय मालिका ‘अग्निहोत्र’मध्ये त्यांनी साकारलेली मोरेश्वर अग्निहोत्री ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. याच महिन्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्यांनी जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे यांच्यासोबत काम केलं. या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीही ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच त्यांनी शूटिंगला सुरुवात केली होती. गोखले नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याचंही काम करत होते.