ऑनलाईन टीम / तरुण भारत :
चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा अविट ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
3 मे 1936 रोजी गुहागर येथे सावरकर यांचा जन्म झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. ‘अपराध मीच केला’, ‘अपूर्णांक’, ‘अलीबाबा चाळीस चोर’, ‘अल्लादीन जादूचा दिवा’, ‘आम्ही जगतो बेफाम’, ‘एकच प्याला’ अशी त्यांची अनेक नाटके गाजली. सावरकर यांनी शंभरहून अधिक मराठी नाटकांमध्ये भूमिका केल्या. मराठी चित्रपटांबरोबरच त्यांनी 30 हून अधिक हिंदी सिनेमातही काम केले आहे. काही महिन्यांपूर्वीच ते ‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिसले होते. शिवाय ‘समांतर’ या वेब सीरिजमध्ये त्यांनी केलेली भूमिकाही विशेष गाजली.
सावरकर यांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं त्यांनी मराठी, हिंदी मनोरंजन विश्वावर वेगळी छाप उमटवली होती. सावरकर यांनी 97 व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्षस्थान भुषविले होते. सावरकर यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे.