चित्रपटांसोबतच टीव्ही मालिकेतही ठसा
प्रतिनिधी/ मुंबई
आपल्या अफलातून कॉमिक टायमिंगसाठी आणि बॉलिवूडमधील अनेक अविस्मरणीय भूमिकांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक सतीश शहा यांचे निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनाने चित्रपट आणि टीव्ही सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सतीश शहा यांची कारकीर्द
सतीश शहा यांचा जन्म 25 जून 1951 रोजी गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात झाला होता. त्यांना अभिनयाची आवड असल्याने ते मुंबईत आले आणि त्यांनी मायानगरीत नशीब आजमावण्यास सुरुवात केली. अभिनयाच्या या प्रवासात त्यांना यश मिळेल, याची त्यांनाही कल्पना नव्हती. सतीश शहा यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1978 मध्ये ‘अजीब दास्तां’ या चित्रपटातून झाली असली तरी, त्यांना खरी ओळख 1983 मध्ये आलेल्या ‘जाने भी दो यारों’ या क्लासिक चित्रपटातून झाली. कुंदन शहा दिग्दर्शित ‘जाने भी दो यारों’ हा एक डार्क कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटात नसीरुद्दीन शहा, ओम पुरी, पंकज कपूर, नीना गुप्ता, रवि वासवानी यांच्यासारखे दिग्गज कलाकार होते.
चित्रपटांसोबतच टीव्ही मालिकेतही ठसा
‘जाने भी दो यारों’ नंतर सतीश शहा यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यांनी टीव्ही मालिकांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. फिल्मी दुनियेत यश मिळवल्यानंतर त्यांनी टीव्हीच्या जगातही मोठा ‘धमाका‘ केला. ‘साराभाई न्s साराभाई‘, ‘नहले पे दहला‘, ‘फिल्मी चक्कर‘ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी जबरदस्त काम केले. याव्यतिरिक्त, ‘ये जो है जिंदगी’ या मालिकेत त्यांनी तब्बल 50 वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली.
चतुरस्त्र अभिनेता, कला क्षेत्रातील मार्गदर्शक दुवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चतुरस्त्र अभिनेते म्हणून सतीश शहा यांनी सिने, नाट्यासृष्टीत आपला वेगळा असा अमिट ठसा उमटविला आहे. सहज-सुंदर अभिनायातून साकारलेल्या भूमिकांच्या रुपांमध्ये ते रसिकांच्या मनांत चिरंतन राहतील, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.









