तालुक्याच्या पूर्वभागाला सलग दोन दिवस वादळी पावसाने झोडपले : शेतकऱ्यांत समाधान
वार्ताहर /सांबरा
तालुक्याच्या पूर्वभागामध्ये सलग दोन दिवस वादळी पावसाने झोडपून काढल्याने हा पाऊस पेरणीपूर्व मशागतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे. तसेच उसासह इतर पिकांनाही हा पाऊस लाभदायक ठरला असल्याने शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसापासून वळिवाने हुलकावणी दिल्याने मशागतीची कामे ठप्प पडली होती. त्यामुळे शेतकरीवर्ग पावसाच्या प्रतीक्षेत होता. तर गेल्या काही दिवसापासून उष्म्यांमध्ये कमालीची वाढ झाली होती. त्यामुळे नागरिक उष्म्याने अक्षरश: त्रस्त झाले होते. अशातच गेल्या दोन दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने उष्म्यामध्ये काहीशी घट होईल.
झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प
पूर्व भागामध्ये मंगळवारी रात्री पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर क्रॉस येथील एक जुनाट वृक्ष बेळगाव-बागलकोट रोडवर कोसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली व रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या. त्यानंतर याची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी कामगारांकरवी झाड रस्त्याच्या बाजूला हटविले व वाहतूक सुरळीत केली.
पूर्वभाग दोन दिवस अंधारात
सोमवार दि. 22 रोजी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर लवकर वीजपुरवठा न आल्याने नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला तर काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण झाली. सांबरा येथील शुक्रवारपेठमधील नवज्योती युवक मंडळाने जि. पं. माजी सदस्य नागेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनरेटरच्या सहाय्याने कूपनलिका सुरू करून पाणीपुरवठा सुरळीत केला व सर्वांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
जनरेटरचा वापर
ग्रा. पं. सदस्य यल्लाण्णा सुळेभावी यांनी स्वत:च्या शेतातील जनरेटर उपलब्ध करून दिले. त्यामुळे त्यांचेही यावेळी आभार मानण्यात आले. या भागात वीजपुरवठा नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली. हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून अखेर मंगळवारी रात्री उशिरा वीजपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे नागरिकांचा जीव भांड्यात पडला.









