आत्महत्येपूर्वी बनवलेला व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल
रत्नागिरी प्रतिनिधी
रिक्षा चालक अविनाश म्हात्रे मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी रिक्षा चालक म्हात्रे याने त्या मुलीवर गंभीर आरोप केले आहेत. त्या प्रकरणानंतर ती मुलगी आपल्याकडे पैशाची मागणी करत होती आणि म्हणूनच आपण आत्महत्या करत असल्याचे म्हात्रे याने व्हिडिओत म्हटले आहे. या व्हिडिओमुळे आता पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
रिक्षा चालक अविनाश म्हात्रे याच्यावर एका कॉलेज युवतीने सोशल मीडियावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. सोशल मीडियावर तिची पोस्ट व्हायरल होताच पोलीस प्रशासनाने अवघ्या काही तासात त्या रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळल्या. रिक्षा चालक म्हात्रे याला जामीन मंजूर होताच त्याने अवघ्या काही तासात आत्महत्या केली. मात्र त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ चित्रित केला आहे. या व्हिडिओत त्याने संबंधित मुलीवर गंभीर आरोप केले आहेत. त्या मुलीने मला फसवलं, ती मुलगी आपल्याकडे पैशाची मागणी करत होती. म्हणून मी आत्महत्या करत आहे. तिने माझ्याबद्दल भरपूर काही व्हायरल केलं आणि ती माझ्याकडे पैशाची मागणी करत होती असे रिक्षा चालक म्हात्रे वारंवार या व्हिडीओत बोलताना दिसत आहे. रिक्षा चालक म्हात्रे याच्या आत्महत्येपूर्वी या व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली असून आता पोलीस प्रशासनासमोर नवं आव्हान उभं राहील आहे.