वृत्तसंस्था/ मोन्झा, इटली
येथे झालेल्या इटालियन ग्रां प्रि फॉर्मुला वन शर्यतीचे जेतेपद रेड बुलच्या मॅक्स व्ह्स्र्टापेनने पटकावले. त्याचे हे विक्रमी सलग दहावे जेतेपद आहे. त्याचाच संघसहकारी सर्जिओ पेरेझने दुसरे तर फेरारीच्या कार्लोस सेन्झ ज्युनियरने तिसरे स्थान मिळविले.
दोनवेळचा विद्यमान विजेता असणाऱ्या व्हर्स्टापेनने निर्दोष ड्रायव्हिंग करीत आपल्याच सहकाऱ्याला 6.802 सेकंदांनी मागे टाकत पहिले स्थान घेतले. तिसरे स्थान मिळविणारा कार्लोस सेन्झ 11.082 सेकंद मागे राहिला. सेन्झचा संघसहकारी चार्लस लेक्लर्कने चौथे स्थान मिळविले.
मॅक्स व्हर्स्टापेनने सेन्झच्या मागे दुसऱ्या स्थानावरून या शर्यतीची सुरुवात केली होती. पण 15 लॅपच्या सुरुवातीस मॅक्सने त्याला मागे टाकले आणि अखेरपर्यंत त्याने ही आघाडी कायम राखली. त्याचे हे विक्रमी दहावे जेतेपद असून त्याने सेबॅस्टियन व्हेटेललचा विक्रम मागे टाकला. चॅम्पियनशिप रेसमध्येही त्याने आपली आघाडी 145 गुणांवर नेऊन ठेवली आहे. या मोसमातील 14 पैकी 12 शर्यती व्हर्स्टापेनने जिंकल्या तर त्याचाच सहकारी पेरेझने उर्वरित दोन शर्यती जिंकल्या. याचाच अर्थ रेड बुल या मोसमात आतापर्यंत अपराजित राहिला आहे. मोन्झामध्येही व्हर्स्टापेनने सलग दुसऱ्या वर्षी जेतेपद पटकावले आहे. मागील वर्षाच्या आधी त्याला एकदाही पाचव्या स्थानाच्या पुढे मजल मारता आली नव्हती.
मर्सिडीजच्या जॉर्ज रसेलने पाचवे, त्याचाच संघसहकारी लेविस हॅमिल्टनने सहावे, अॅलेक्स अल्बनने सातवे, लँडो नॉरिसने आठवे, फर्नांडो अलोन्सोने नववे व व्हाल्टेरी बोटासने दहावे स्थान मिळविले.









