तळेगावात एकाकी अवस्थेत अखेरचा श्वास : फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह : पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
प्रतिनिधी/ पुणे
आपल्या राजबिंड्या व्यक्तिमत्त्वाच्या बळावर ‘झुंज’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘देवता’, ‘लक्ष्मीची पाऊल’ अशा विविध मराठी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवणारे प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचे तळेगाव-दाभाडे येथे एकाकी अवस्थेत निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी माधवी, मुलगी रश्मी व मुलगा गश्मीर असा परिवार आहे. ते राहत असलेल्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी त्यांचा मृतदेह आढळला असून, दोन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. त्यामुळे महाजनी यांची अशी एक्झिट चाहत्यांना चटका लावून गेली. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
महाजनी हे तळेगाव दाभाडेमधील आंबी येथील क्सर्बिया सोसायटीमध्ये भाडेतत्त्वावर मागच्या आठ महिन्यांपासून राहत होते. आजूबाजूच्या लोकांशी त्यांचा फारसा संपर्क नव्हता. इमारतीमध्ये कचरा गोळा करण्यासाठी येणाऱ्या महिलेशी महाजनी यांचा दररोज जुजबी संवाद व्हायचा. मृत्यूपूर्वी त्यांचा शेवटचा संवाद याच महिलेशी झाला होता. शुक्रवारी सकाळपासूनच बिल्डिंगमध्ये विचित्र वास येत होता. दुपारनंतर दुर्गंधी जास्त वाढली. त्यामुळे बिल्डिंगमधील रहिवाशांनी वास नेमका कुठून येत आहे, याचा शोध घ्यायला सुऊवात केली. बराच शोध घेतल्यानंतर सगळ्यांच्या नजरा तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या रवींद्र महाजनी यांच्या फ्लॅट नंबर 311 कडे वळल्या. याच फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करताच रवींद्र महाजनी घरात जमिनीवर पडलेले दिसले.
…पण त्यांनी दार उघडले नाही!
दरम्यान, तळेगावमधील त्यांच्या राहत्या ठिकाणी सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या आदिका वारंगे या प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या, कधी कधी महाजनी यांना मी पाण्याची बाटली आणल्यावर दरवाजापर्यंत नेऊन देत असे. बुधवारी माझी सुट्टी होती. त्यामुळे मी कचरा घ्यायला गेले नव्हते. मंगळवारी रवींद्र महाजनी यांनी स्वत: माझ्या हातात कचरा दिला होता. कचरा देताना ते थोडफार बोलत असत. मी कचरा घेण्यासाठी दरवाजा ठोठावल्यानंतर ते आतून आवाज द्यायचे. मी काल सकाळी त्यांच्या घरी कचरा घेण्यासाठी गेले. तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांना हाका मारल्या, दरवाजा ठोठावला. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने मी निघून आले. मला वाटले, ते झोपले असतील, मग मी दुपारी कचरा घ्यायला गेले. तेव्हाही मी दरवाजा वाजवला, पण त्यांनी दार उघडले नाही.
बेळगाव आजोळ
ज्येष्ठ पत्रकार ह. रा. महाजनी हे रवींद्र महाजनी यांचे वडील, तर सुशीलाबाई या मातोश्री. सुशीलाबाई यांचे माहेर बेळगाव. त्यामुळे बेळगाव हे त्यांचे आजोळ. शालेय जीवनापासून त्यांना अभिनयाची आवड होती.









