बेळगाव : शिक्षक भरतीसाठी सोमवार दि. 22 पासून उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. क्लब रोड येथील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 29 मे पर्यंत वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. राज्यात 15 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचे मागच्या सरकारमधील शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी जाहीर केले होते. त्यानुसार सीईटी परीक्षा घेण्यात आली. परंतु, आरक्षणानुसार योग्य उमेदवार नसल्याने राज्यात 13 हजार पात्र उमेदवारांची निवड झाली. वर्षभर चाललेल्या या प्रक्रियेनंतरही तांत्रिक अडचणी राहिल्याने शिक्षक भरती रखडली जात होती. सोमवार दि. 22 मे पासून पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात मराठी, कन्नड व उर्दू माध्यमाच्या 608 पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. शिक्षण विभागाने कागदपत्रांच्या पडताळणीचे वेळापत्रक जरी जाहीर केले असले तरी ठिकाण मात्र जाहीर केले नव्हते. रविवारी उमेदवारांना ठिकाण सांगण्यात आले. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कागदपत्रांची पडताळणी होणार असून उमेदवारांकडून मूळ कागदपत्रे घेतली जाणार आहेत.
शिक्षक भरतीला मिळणार गती
नवीन सरकार अस्तित्वात आल्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर लगेचच अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे पुढच्या दोन महिन्यात शिक्षक भरती पूर्ण होऊन अंतिम उमेदवार शाळांवर रुजू होण्याची शक्यता आहे.
वेळापत्रकानुसारच पडताळणी होणार
शिक्षक भरतीसाठी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी सोमवारपासून केली जाणार आहे. क्लब रोड येथील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात याची व्यवस्था करण्यात आली आहे. विषयानुरुप वेळापत्रक देण्यात आले असून त्यानुसारच कागदपत्रांची पडताळणी होणार आहे.
– सुजाता बाळेकुंद्री (नोडल अधिकारी)









