वृत्तसंस्था / व्हिएन्ना
जर्मनीचा टेनिसपटू अॅलेक्सझांडेर व्हेरेवने 2025 च्या टेनिस हंगाम अखेरीस होणाऱ्या एटीपी फायनल्स स्पर्धेचे आपले तिकीट निश्चित केले आहे. आता या स्पर्धेमध्ये स्पेनचा अल्कारेझ, इटलीचा सिनेर तसेच सर्बियाचा जोकोविच यांनीही आपले स्थान निश्चित केले आहे. व्हेरेवने यापूर्वी दोनवेळा एटीपी फायनल्स स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे.
ट्युरीनमध्ये सुरू असलेल्या एटीपी टूरवरील स्पर्धेत जर्मनीच्या व्हेरेवने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीतून हॉलंडच्या ग्रिकस्पूरने दुखापतीमुळे माघार घेतल्याने व्हेरेवला उपांत्य फेरीसाठी पुढे चाल मिळाली. गेल्या जानेवारीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत व्हेरेवने उपविजेतेपद मिळविले होते. एटीपी फायनल स्पर्धा 9 ते 16 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. आतापर्यंत चार टेनिसपटूंनी या स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले आहे. 28 वर्षीय व्हेरेवने 2018 आणि 2021 साली एटीपी फायनल्स स्पर्धा जिंकली होती.









