वृत्तसंस्था / टोरँटो
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या नॅशनल बँक खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जर्मनीचा टॉपसिडेड अॅलेक्झांडर व्हेरेव्हने ऑस्ट्रेलियाचा विद्यमान विजेता अॅलेक्सी पॉपीरिनचा पराभव करत एकेरीची उपांत्य फेरी गाठली.
या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत व्हेरेव्हने 18 व्या मानांकीत पॉपीरिनचे आव्हान 6-7 (6-8), 6-4, 6-3 अशा सेट्समध्ये संपुष्टात आणत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. 2017 साली व्हेरेवने ही स्पर्धा जिंकली होती. एटीपीच्या सध्याच्या मानांकनात व्हेरेव्ह तिसऱ्या स्थानावर असून त्याने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत एटीपी टूरवरील स्पर्धांमध्ये 75 वेळा उपांत्य फेरी मजल मारली आहे. व्हेरेव्हने एटीपी टुरवर आतापर्यंत 24 स्पर्धा घेतल्या असून त्याने एटीपी 1000 दर्जाच्या मास्टर्स स्पर्धेचे आठवेळा विजेतेपद मिळविले आहे.
या वर्षीच्या टेनिस हंगामात जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत व्हेरेव्हला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चालु वर्षामध्ये व्हेरेव्हने आतापर्यंत प्लेकोर्टवरील दोन स्पर्धा जिंकल्या आहेत. टोरँटोमधील या स्पर्धेत इटलीचा जेनिक सिनेर आणि स्पेनचा अल्कारेझ तसेच सर्बियाचा जोकोविच आणि जॅक ड्रेपर यांनी आपला सहभाग दर्शविलेला नाही. 25 वर्षीय पॉपीरिनची गेल्या 9 सामन्यातील विजयी घोडदौड या स्पर्धेत रोखली गेली.









