शिंदे-ठाकरे गट आमने सामने : प्रतिज्ञापत्र चौकशीच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
प्रतिनिधी/कोल्हापूर
खोटी प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणाची चौकशी सुरू असताना एकेकाळी शिवसेनेत हातात हात घालून काम केलेल्या खासदार संजय मंडलिक आणि जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या शाब्दिक वॉर पाहण्यास मिळाले. मंडलिकांनी केलेली टीका आणि त्याला देवणे यांनी दिलेले उत्तर यामुळे जिल्हय़ाच्या राजकारणात आता नव्या संघर्षाला सुरूवात झाली आहे.
शाब्दिक वॉरमध्ये मंडलिक आणि देवणे यांनी केलेली विधाने सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर आलेल्या प्रतिक्रियाही राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चेचा विषय ठरल्या. एकीकडे खासदार मंडलिक हे टीकाटिप्पण्णी करत असताना शिंदे गटातील इतर खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबीटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर व इतर पदाधिकाऱ्यांचे मात्र मौन होते. त्याचबरोबर ठाकरे गटाची खिंड विजय देवणे यांच्याबरोबर संजय पवार, मुरलीधर जाधव हे जिल्हाप्रमुख लढविताना दिसले.
मंडलिक आणि देवणे काय म्हणाले….
शिवसैनिकांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करणे दुर्दैवी : खासदार संजय मंडलिक
सच्च्या शिवसैनिकांनी जर खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले असेल तर ती बाब दुर्दैवी आहे. या संदर्भात तपासानंतर न्यायालयच निर्णय घेईल. 70 टक्के शिवसैनिक शिंदे गटाकडे आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची हे सिद्ध झालेले आहे. आम्हाला (शिंदे गटाला) गद्दार म्हणणाऱयांनी शिवसेनेचा विचार कोणी सोडला ते प्रथम पाहावे. खोटी प्रतिज्ञापत्रे सादर करून भाडोत्री माणसे गोळा केल्याचा आरोपही मंडलिकांनी केला.
तपासानंतर दूध का दूध, पानी का पानी होईल : जिल्हाप्रमुख विजय देवणे
कोल्हापूर जिल्हय़ातून शिवसैनिकांकडून देण्यात आलेली प्रतिज्ञापत्रे सत्य आहेत. त्यामध्ये कोणताही खोटेपणा केलेला नाही. या संदर्भात पोलिसांकडून सुरू करण्यात आलेल्या तपासाला देखील आम्ही सहकार्य करत आहोत. तपासानंतर खरे काय आणि खोटे काय म्हणजेच दूध का दूध आणि पानी का पानी होईल. त्याचबरोबर मूळ शिवसेना कोणाची हे देखील सिद्ध होईल, असे जिल्हा प्रमुख विजय देवणे म्हणाले.
2024 मध्ये कोल्हापूरची जनता मंडलिकांना जागा दाखवेल
खासदार संजय मंडलिक यांनी खाल्लेल्या घराचे वासे मोजले आहे. रात्रीचा दिवस करून शिवसैनिकांनी त्यांना खासदार केले ते मंडलिक विसरले. सत्तेच्या स्वार्थ्यासाठी त्यांनी गद्दारी केली. कोल्हापूरची जनता त्यांना 2024 निवडणुकीत जागा दाखवेल, अशा शब्दात खासदार मंडलिक यांचा जिल्हा प्रमुख देवणे यांनी समाचार घेतला.