परेशच्या जामिनावर आता गुरुवारी सुनावणी
फोंडा : फोंडा-पणजी महामार्गावरील बाणस्तारी पुलावर मद्यधुंद अवस्थेत मर्सिडिजने ठोकरून तीन निष्पापांचा बळी घेतल्याप्रकरणी अटकपूर्व जामिनावर दिलासा मिळालेल्या कारमालक मेघना सावर्डेकर हिची अखेर न्यायालयात जबानी नोंद करण्यात आली. अपघाताच्या तब्बल पंधरा दिवसानंतर काल सोमवारी 21 रोजी सकाळी फोंडा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात तीन तास जबानी नोंद करण्यात आली. यावेळी तिच्यासोबत अपघातावेळी वाहनांमध्ये उपस्थित असलेल्या तीन मुलांपैकी एक मुलगा उपस्थित होता. मर्सिडीजचा अपघात झाला तेव्हा पाचजण कारमध्ये होते. चालक व सहचालक पुढील सीटवर तर तिन्ही मुले पाठिमागे बसली होती. त्यापैकी एकाची जबानी नोंद करण्यात आलेली आहे. अन्य दोघांची जबानी नोंद करण्यात येणार आहे. दरम्यान कारचालक श्रीपाद उर्फ परेश सिनाय सावर्डेकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेली आहे. अपघाताची ही घटना रविवार 6 ऑगस्ट रोजी रात्री घडली होती. सावर्डेकर आपल्या तीन मुले व पत्नीसह ओपा खांडेपार येथील नंदनवन फार्ममध्ये फ्रेन्डशिप डे साजरा करून घरी परतत असताना बाणस्तारी पुलावर हा अपघात घडला होता. यावेळी दिवाडी येथील फडते दांपत्य व अरूप कर्माकर अशा तिघा निष्पापांचा मृत्यू झाला होता.
परेशच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी
संशयित वाहनचालक परेश सिनाय सावर्डेकर याच्या जामीन अर्जावरील मुंबई उच्च नयायालयाच्या गोवा पीठातील सुनावणी तहकूब करण्यात आली असून ती आता गुरुवारी होणार आहे. त्यामुळे त्यांना गुरूवारपर्यंत कोठडीतच रहावे लागणार आहे. सीआयडीने मेघना सावर्डेकर यांचे म्हणणे नोंद केल्याने परेश यांची सुनावणी पुढे ढकलावी अशी विनंती न्यायालयास केली तसेच बुधवारी आणखी दोन साक्षीदारांचे म्हणणे नोंदवण्यात येणार असल्याने सुनावणी पुढे न्यावी, असे सीआयडीने सुचित केल्यानंतर न्यायालयाने ते मान्य करून सुनावणी तहकूब केली.








