अध्याय अकरावा
या अध्यायामध्ये बाप्पा राजाला तप, दान, ज्ञान, कर्म, सुखदु:ख, ब्रह्म, वर्णनिहाय कर्मांचे प्रकार इत्यादीबाबत माहिती देऊन स्वकर्म करत राहून ती मला अर्पण कर असा मोलाचा उपदेश करत आहेत. पहिल्या श्लोकात तपाबद्दल बोलताना बाप्पा म्हणाले, जे काही अवघड असल्याने अप्राप्य आहे ते तपाने साध्य होते. तो श्लोक असा, तपोऽपि त्रिविधं राजन्कायिकादिप्रभेदतऽ । ऋजुतार्जवशौचानि ब्रह्मचर्यमहिंसनम् ।। 1 ।। सध्या त्याचा आपण अभ्यास करत आहोत. त्यानुसार तपाचे कायिक, वाचिक व मानसिक असे तीन प्रकार असतात. कायिक तप माणसाच्या वर्तनाशी संबंधित असते. कितीही विचारपूर्वक वागणारा मनुष्य असला तरी कुठे ना कुठे तो चुकतोच व नंतर त्याला त्याबद्दल पश्चाताप करावा लागतो. अशी वेळ येऊ नये म्हणून त्याने स्वभावात ऋजुता, शौच, ब्रह्मचर्य व अहिंसा ही तत्वे मुद्दामहून रुजवावीत. ऋजुता अंगी बाणवण्यासाठी सरळ मार्गाने जाण्याचा सराव करणे आवश्यक असते. यामध्ये मन, वाणी आणि शरीर यांच्यात एकसुत्रीपणा आणण्याचा समावेश होतो. आपल्या कृतीने दुसऱ्याला त्रास न होता, त्याचे भले व्हावे असे सरळपणे वागणाऱ्याला वाटत असते पण प्रत्यक्षात कळत, नकळतपणे विचार आणि कृती ह्यांचा मेळ बसत नाही. अर्थात आपल्या कृतीचे जे परिणाम होतात त्यामुळे दुसऱ्याला मानसिक किंवा शारीरिक त्रास होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन माणसाने नेहमी आपल्या कृतीने दुसऱ्याचे भले कसे होईल, ह्याबद्दल विचार करण्याचा सराव करावा. ह्याला कायिक तप असे म्हणतात. कायिक तप करण्यासाठी बाप्पांनी सांगितलेले पुढील मुद्दे असे आहेत.
शौच : शौच म्हणजे शारीरिक स्वच्छता राखणे. शरीर जेव्हढे स्वच्छ असते तेव्हढे मन प्रसन्न राहते, मनाची एकाग्रता राखली जाते. वागण्याबोलण्यात सरळपणा ठेऊन, स्वच्छ प्रसन्न चेहऱ्याचा मनुष्य सर्वांना हवाहवासा वाटतो.
ब्रह्मचर्य :- ब्रह्म म्हणजे वेद, त्याच्या अध्ययनासाठी आचरणीय असे जे व्रत त्याला ब्रह्मचर्य असे म्हणतात. जो सतत ब्रह्माच्या चिंतनात मग्न असतो तो खरा ब्रह्मचारी होय.
अहिंसा :- आपल्या कोणत्याही कर्मातून अन्य प्राणीमात्रांना त्रास, पीडा, इजा होऊ नये असे वागणे म्हणजे अहिंसा.
ऋजुता, शौच, ब्रह्मचर्य आणि अहिंसा ही बंधने पाळल्यास आपल्या वर्तनाबद्दल पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. पुढील श्लोकात बाप्पा वरील तत्वे अंगात रुजण्याच्या दृष्टीने, ही तत्वे अंगात रुजवलेल्या गुरु, ज्ञानी, ब्राह्मण व देवांच्या पूजनाचे महत्त्व सांगत आहेत.
गुरुविज्ञद्विजातीनां पूजनं चासुरद्विषाम् ।
स्वधर्मपालनं नित्यं कायिकं तप ईदृशम् ।। 2 ।।
गुरु :- गुरु ज्ञानी तर असतातच शिवाय त्यांनी आत्मसात केलेले ज्ञान प्रत्यक्षात उतरवण्याचे विज्ञानही जाणलेले असते. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे भौतिकाचे ज्ञान. प्रत्येक शिष्याच्या कुवतीनुसार ते त्याला ज्ञान आणि विज्ञान जाणण्याच्या दृष्टीने तयार करत असतात. म्हणून गुरुचे स्थान पहिले आहे. शिष्याचं कल्याण साधून देणारे सर्वजण गुरुच असतात. सद्गुरु मात्र तुम्हाला मोक्षमार्ग दाखवतात. ते सर्वश्रेष्ठ होत. प्रत्येकाचे जन्मोजन्मीचे सद्गुरु एकच असतात.
ज्ञानी : यांचा विज्ञान या विषयाचा अभ्यास गाढा असतो. भौतिकाची म्हणजे समोर दिसणाऱ्या वस्तुंची सर्व माहिती यांनी अनुभवातून मिळवलेली असते व ते ज्ञान ते सर्वांपर्यंत पोहोचवत असतात. अशा लोकांच्याबद्दल आदर बाळगून त्यांचे पूजन करावे.
ब्राह्मण : वर सांगितल्याप्रमाणे जे ज्ञानी असतील त्यांना त्या काळात ब्राह्मण ही संज्ञा दिली जाई. अत्यंत शुद्ध आचरणाने, ऋजु स्वभावाने ब्राह्मण लोक आदरणीय होतात म्हणून त्यांचे पूजन करावे.
क्रमश:








