अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गोंधळाचे वातावरण : आधी चर्चा करण्याची विरोधी पक्षाने केली मागणी
बेळगाव : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत वक्फ मंडळाकडून शेतकरी व धार्मिक संस्थांना दिलेल्या नोटिसींचा मुद्दा चर्चेला आला. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये शाब्दिक चकमकी झडल्या. त्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी श्रद्धांजलीनंतर सभाध्यक्षांचे आसन बदलल्याचे जाहीर केले. या आसनाचे वैशिष्ट्या सांगितल्यानंतर सभागृहाबाहेर बाराव्या शतकातील क्रांतिकारी संत महात्मा बसवेश्वर व अल्लमप्रभू आदी संतांचा समावेश असलेले अनुभव मंटपाचे तैलचित्राचे अनावरण केल्याचे जाहीर केले. त्यावेळी विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी वक्फ नोटीशींचा मुद्दा उपस्थित केला.
महात्मा बसवेश्वरांच्या तैलचित्राचे अनावरण झाले आहे. आनंदाची गोष्ट आहे. मात्र, वक्फने शेतकऱ्यांना, मठ-मंदिरांना पाठविलेल्या नोटिसांमुळे धार्मिक संस्थांचे स्वातंत्र्यही अडचणीत आले आहे. यासंबंधी आपण स्थगन प्रस्ताव मांडला आहे. सर्व विषय बाजूला ठेवून या मुद्द्यावर चर्चेला परवानगी द्यावी, अशी मागणी केली. आर. अशोक यांच्या मागणीनंतर मंत्री कृष्णभैरे गौडा, डॉ. शरणप्रकाश पाटील आदींनी सभागृहाच्या नियमानुसार चर्चेला संधी द्या, आधी प्रश्नोत्तराचा तास होऊ द्या, त्यानंतर या मुद्द्यावर चर्चेला संधी द्यावी. उत्तर देण्यासाठी सरकार तयार आहे, असे सांगितले.
विरोधी पक्षनेत्यांपाठोपाठ आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ, अरविंद बेल्लद आदींनी वक्फच्या मुद्द्यावर आधी चर्चा होऊ द्या, अशी मागणी केली. बसवेश्वरांच्या अनुभव मंटपाचा तुम्ही येथे उल्लेख करीत आहात. मात्र, बसवेश्वरांची मंदिरे वक्फच्या ताब्यात जात आहेत. याला कोण जबाबदार? असा प्रश्न आर. अशोक यांनी उपस्थित केला. याला आक्षेप घेत डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी भाजप नेते बसवेश्वरांचे विरोधक आहेत. बसवेश्वरांबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्यात आले आहे. त्यांच्याविषयी बोलण्याचा नैतिक हक्क भाजपला नाही, असे सांगताच दोन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये वादावादी वाढली.
आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी सभागृहाचा वेळ वाया घालवू नये, इतर गंभीर विषयांवर चर्चा होऊ द्या. वक्फवरील चर्चेला उत्तर देण्यासाठी सरकार तयार आहे, असे कृष्णभैरे गौडा यांनी सांगितले. याला सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी होकार दर्शवत सभागृहाच्या नियमानुसार कामकाज चालवा, अशी मागणी केली. यानंतरही भाजपच्या आमदारांनी प्रश्नोत्तर रद्द करून वक्फच्या मुद्द्यावर चर्चेला अनुमती मागितली. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून विरोधी पक्ष जो मुद्दा मांडणार आहे, सरकारला तो शांतपणे ऐकून घेऊन त्यावर उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रश्नोत्तरानंतर चर्चेला सुरुवात करू, असे सांगत सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी या मुद्द्यावर पडदा टाकला.
तिघा आमदारांनी घेतली शपथ
सोमवारी सकाळी 11.25 वाजण्याच्या सुमारास विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. वंदे मातरम्नंतर भारतीय संविधानाचे उद्देशिका वाचण्यात आले. त्यानंतर संडूरचे नवनिर्वाचित आमदार ई. अन्नपूर्णा, शिग्गावचे यासीर अहमदखान पठाण, चन्नपट्टणचे सी. पी. योगेश्वर यांनी आमदारकीची शपथ घेतली. त्यानंतर दु:खवट्याचा ठराव मांडण्यात आला. माजी मंत्री मनोहर तहसीलदार, के. एच. श्रीनिवास, माजी आमदार बसवराजू ए. एस., माजी आमदार लक्ष्मीनारायण के., वेंकटरेड्डी मुदनाळ, उद्योजक रतन टाटा, गुलबर्गा येथील सुफी संत सय्यद शहा खुस्रो हुसेनी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यासह अनेक नेत्यांनी दु:खवट्याच्या ठरावावरील चर्चेत भाग घेतला.
…हे तर आपले भाग्य! : बसवेश्वरांच्या तैलचित्राच्या अनावरणानंतर मुख्यमंत्र्यांचे भावनिक उद्गार
विश्वगुऊ बसवेश्वरांनी स्थापन केलेले अनुभव मंटप हे जगातील पहिली संसद आहे. त्या अनुभव मंटपाच्या तैलचित्राचे सुवर्ण विधानसौधमध्ये सोमवारी आपल्या हस्ते अनावरण करण्यात आले, हे आपले भाग्य आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत सांगितले. सेंटर हॉलसमोर सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी सभाध्यक्ष यु. टी. खादर, विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी, एच. के. पाटील, सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, विरोधी पक्षनेते आर. अशोक आदींसह अनेक नेते उपस्थित होते. अल्लमप्रभू, बसवेश्वर, अक्कमहादेवीसह बाराव्या शतकातील संत अनुभव मंटपात असलेले हे तैलचित्र आहे. विधानसभेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी अनुभव मंटपाच्या तैलचित्राबद्दल सभाध्यक्षांचे अभिनंदन केले. बाराव्या शतकात सामाजिक असमानता दूर करून बसवेश्वरांनी शोषणमुक्त समाजनिर्मिती केली. महिलांनाही प्राधान्य दिले. जातविरहित समाज अस्तित्वात आणण्यासाठी त्यांनी सामाजिक क्रांती केली. दया हीच धर्माची मूळ आहे, ही शिकवण त्यांनी दिली, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी बाराव्या शतकातील जाती व्यवस्थेची सभागृहाला माहिती दिली.
बसवेश्वर, कनकदास, कुवेंपू आदींचे वचन, काव्यांचा उल्लेख करीत 21 व्या शतकातही जाती व्यवस्था पूर्णपणे नष्ट झाली नाही. तर बाराव्या शतकात काय परिस्थिती असणार? अशा अवस्थेतही बसवेश्वर व त्यांच्या समकालीन संतांनी जाती व्यवस्था, अंधश्रद्धा, शोषण आदींवर आघात केला. गौतम बुद्धांच्या काळातही सर्व जाती-धर्माच्या प्रतिनिधींना समान स्थान असलेले मंटप होते, हे चरित्रातून कळते. ज्यांना आपला इतिहास माहीत नाही, ते नवा इतिहास घडवू शकत नाहीत, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. म्हणून युवापिढीने इतिहास जाणून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
बेंगळूर येथील चित्रकला परिषदेचे कलाकार सतीश राव, शिमोगा येथील श्रीकांत हेगडे, केन कला शाळेचे अशोक यु. जगळुरू, राजा रवी वर्मा कला शाळेच्या रुपा एम. आर. व बैलहोंगल येथील वीरण्णा बेळ्ळी, महेश जमखंडी आदींनी हे तैलचित्र साकारले आहे. विधानसभेत अनुभव मंटपाचे तैलचित्र लावण्याचा संकल्प सभाध्यक्ष यु. टी. खादर यांच्यामुळे पूर्ण झाला आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. बसवेश्वरांच्या समाजक्रांतीबद्दल सभागृहात बोलतानाच मंत्री ईश्वर खंड्रे यांनी बसनगौडा पाटील-यत्नाळ यांचा नामोल्लेख न करता बसवेश्वरांचा अपमान करणाऱ्यांना त्यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार कोठे येतो? असा प्रश्न उपस्थित केला. याला भाजपच्या आमदारांनी आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते आर. अशोक, एच. सी. महादेवप्पा, बसवराज रायरेड्डी, अरविंद बेल्लद, बी. वाय. विजयेंद्र, आप्पाजी नाडगौडा, एच. के. पाटील, शशिकला जोल्ले आदींनी या चर्चेत भाग घेतला.
तैलचित्रावरून सुरू झालेल्या चर्चेत बसवेश्वरांच्या एका छायाचित्राला आक्षेप घेण्यात आला. सभाध्यक्षांच्या आसनाच्या वर बसवेश्वर उजव्या हाताने आशीर्वाद देताना उभे असलेले चित्र आहे. त्यांच्या आसनाच्या पाठीमागे उजव्या बाजूला स्वामी विवेकानंद, सुभाषचंद्र बोस व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र तर आसनाच्या वर बसवेश्वरांचे चित्र आहे. डाव्या बाजूला महात्मा गांधीजी, सरदार वल्लभभाई पटेल व स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चित्र आहेत. बसवराज रायरेड्डी व आप्पाजी नाडगौडा यांनी बसवेश्वरांच्या चित्राला आक्षेप घेतला. सभाध्यक्षांनी हे चित्र बदलावे, अशी मागणी केली.









