अतिक्रमण हटावला विरोध : मास्टर प्लॅनसाठी जागा दिलेल्यांना भरपाई देण्याची मागणी
►प्रतिनिधी / बेळगाव
अतिक्रमण हटविण्यावरून मनपा कर्मचारी आणि टेंगीनकेरा गल्लीतील व्यापाऱ्यांमध्ये शनिवार दि. 8 रोजी शाब्दीक चकमक उडाली. मास्टर प्लॅनसाठी घेण्यात आलेल्या जागेची नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यातच आता दुकानासमोर लावण्यात आलेले साहित्य हटवले जात आहे. आधी भरपाई द्या मगच कारवाई करा, असा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतल्याने मनपा कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.
पोलीस खाते आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने बाजारपेठेतील अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करण्यात आली आहे. दुकानाबाहेर लावण्यात आलेले साहित्य जप्त केले जात आहे. गेल्या पंधरा दिवसापासून सातत्याने ही मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. गणपत गल्ली, खडेबाजार, भेंडीबाजार, पांगुळ गल्ली, काकतीवेस, किर्लोस्कर रोड, माऊती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली आदी ठिकाणी पोलीस आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून फेरफटका मारत अतिक्रमण हटविले जात आहे. सूचना करून देखील जे व्यापारी दुकानाबाहेर जाहिरात फलक किंवा साहित्य लावत आहेत ते जप्त केले जात आहे. त्याचप्रमाणे शनिवारी सायंकाळी महानगरपालिकेचे कर्मचारी टेंगीनकेरा गल्लीत गेले होते. त्याठिकाणी दुकानासमोर लावण्यात आलेले साहित्य हटवा अन्यथा जेसीबी लावून साहित्य काढले जाईल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दुकानदारांना दिला. त्यामुळे संतप्त व्यापारानी एकत्र येत मनपा कर्मचाऱ्यांना जाब विचारला.
टेंगीनकेरा गल्लीत मास्टर प्लॅनसाठी जागा देण्यात आली आहे. मात्र, जागा दिलेल्यांना महापालिकेने अद्याप नुकसानभरपाई दिलेली नाही. आधी नुकसान भरपाई द्या, मगच कारवाई करा, असा आक्रमक पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतल्याने मनपा कर्मचारी आणि व्यापाऱ्यांत काहीवेळ शाब्दीक चकमक उडाली. त्यानंतर आपले जे काही म्हणणे आहे ते लेखी स्वरूपात द्या, ते आम्ही मनपा आयुक्तांना कळवू असे सांगून मनपा कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला.









