वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
डब्ल्यूटीए टूरवरील क्लेव्हलँड येथे पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या टेनिस स्पर्धेतून अमेरिकेची वयस्कर आणि अनुभवी महिला टेनिसपटू व्हिनस विलियमसने माघार घेतली आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे 43 वर्षीय व्हिनसने स्पर्धा आयोजकांना आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळविले आहे.
व्हिनसने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 7 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. 28 ऑगस्टपासून न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या 2023 च्या टेनिस हंगामातील शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत आपण चांगली कामगिरी करेन. असा विश्वास व्हिनसने व्यक्त केला आहे. व्हिनसने 2000 व 2001 साली अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा तसेच त्यानंतर पाच वेळेला विंबल्डन स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद मिळविले आहे. व्हिनसने आपले शेवटचे एकेरीचे जेतेपद 2008 साली पटकाविले होते.









