वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेची माजी महिला टेनिसपटू 45 वर्षीय व्हिनस विलियम्सचे तब्बल 16 महिन्यानंतर टेनिस क्षेत्रात पुनरागमन होत आहे. व्हिनसने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत सात ग्रॅन्डस्लीम अजिंक्यपदे मिळविली असून ती सेरेना विलियम्सची मोठी बहीण आहे.
डब्ल्यूटीए टूरवरील वॉशिंग्टन खुली महिलांची 500 दर्जाची हार्डकोर्ट टेनिस स्पर्धा 21 ते 27 जुलै दरम्यान येथे खेळविली जाणार असून या स्पर्धेत स्पर्धा आयोजकांनी व्हिनसला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्याचे निश्चित केले असून व्हिनसने हे वाईल्ड कार्ड स्वीकारले आहे. 2024 च्या मार्चमध्ये झालेल्या मियामी टेनिस स्पर्धेत व्हिनसने आपला शेवटचा सहभाग दर्शविला होता. व्हिनसने यापूर्वी पाचवेळा विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा तसेच दोनवेळा अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून तिने आपली बहीण सेरेना समवेत 14 ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत महिला दुहेरीची अजिंक्यपदे मिळविली आहेत.









