वृत्तसंस्था/ लंडन
3 जुलैपासून येथे सुरू होणाऱ्या 2023 च्या टेनिस हंगामातील तिसऱ्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत अमेरिकेची वयस्कर महिला टेनिसपटू 43 वर्षीय व्हिनस विलियम्सला स्पर्धा आयोजकांनी महिला एकेरीसाठी वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश दिला आहे.
व्हिनसची आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील विम्बल्डन स्पर्धेतील 24 वी हजेरी राहिल. व्हिनसने आतापर्यंत या प्रतिष्ठेच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत 5 वेळा एकेरीचे अजिंक्यपद पटकावले आहे. अखिल इंग्लंड क्लबच्या ग्रासकोर्टवर खेळवल्या जात असलेल्या विम्बल्डन स्पर्धेत व्हिनसने तब्बल 20 वर्षापूर्वी आपले पदार्पण केले होते. 2017 साली या स्पर्धेत व्हिनसने एकेरीची अंतिम फेरी गाठली होती. डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या मानांकन यादीत व्हिनस सध्या 697 व्या स्थानावर आहे. बर्मिंगहॅम क्लासिक टेनिस स्पर्धेत सोमवारी व्हिनसने इटलीच्या जॉर्जीचा पहिल्याच फेरीत पराभव केला होता. व्हिनसची लहान बहीण सेरेनाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत सातवेळा विम्बल्डन सर्माज्ञीचा बहुमान मिळवला आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत सेरेनाला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागल्यानंतर तिने टेनिस क्षेत्रापासून निवृत्तीचा निर्णय तातडीने घेतला. 2023 च्या विम्बल्डन स्पर्धेत महिलांच्या विभागात व्हिनस विलियम्स, युक्रेनची स्विटोलिना, ब्रिटनची वॅटसन आणि बोल्टर यांना वाईल्ड कार्डद्वारे तर पुरुषांच्या विभागात बेल्जियमच्या डेविड गोफिनला वाईल्ड कार्डद्वारे एकेरीत प्रवेश देण्यात आला आहे.









