आकाशाशी नाते जोडलेल्या पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने भारतीय खगोलशास्त्र क्षेत्राचा महाताराच निखळला. मूळ कोल्हापूर येथील जयंत नारळीकर यांनी खगोलशास्त्रामध्ये फार मोठी प्रगती केली. त्यानंतर आपल्याकडील सारे ज्ञान त्यांनी देशाला आणि जगाला वाटून टाकले. खगोलशास्त्रामध्ये त्यांनी जे संशोधन केले त्या संशोधनाचे कौतुक केवळ भारतातच नव्हे तर विदेशातदेखील झाले. त्यामुळेच त्यांना जगभरातून मान्यता मिळाली होती. ब्रिटिश खगोल शास्त्रज्ञ फ्रेड व्हायल यांच्यासोबत त्यांनी जे खगोलशास्त्रातील संशोधनावर काम केले त्यातून त्यांचा नावलौकिक वाढत गेला. आपल्या आयुष्यात त्यांनी खगोलशास्त्राच्या अभ्यासाचा ध्यास धरला आणि बऱ्याच प्रमाणात संशोधन केले. ते स्वत: लेखक होते. त्यांनी खगोलशास्त्राचा संपूर्ण जगभरात प्रसार केला. मराठी भाषेबरोबरच इंग्रजी आणि हिंदी भाषेवर त्यांचे जबरदस्त प्रभुत्व होते. मराठी साहित्यक्षेत्रात त्यांनी केलेल्या विपुल कामगिरीबद्दल 2021 मध्ये नाशिक येथे आयोजित 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ अॅस्ट्रॉनॉमिक अँड अॅस्ट्रोफिजिक्स आयुका या संस्थेची स्थापना त्यांनी 1988 मध्ये केली होती. त्यांनीच या संस्थेचे पहिले संचालक म्हणून कार्यभार सांभाळला होता. वैज्ञानिक असले तरी त्यांना साऱ्या जनतेबद्दल आस्था, प्रेम होतं. मुलांबद्दल कमालीची जवळीक होती. मुलांनी भरपूर शिकावे, विज्ञानक्षेत्रात कार्य करावे, खगोलशास्त्राचा अभ्यास करावा यात त्यांना विशेष आवड होती. त्यामुळेच त्यांनी अनेक मराठी पुस्तकेदेखील लिहिली. जेणेकरून मुलांनी त्यांचा अभ्यास करावा आणि या खगोलशास्त्राबद्दल त्यांच्यामध्ये कुतुहल निर्माण व्हावे याकरिता त्यांनी शाळकरी मुलांनादेखील व्याख्याने दिली. शिवाय अनेक महाविद्यालये, विद्यापीठ आणि जागतिक पातळीवर अनेक ठिकाणी त्यांनी आपले संशोधनपर प्रबंध सादर केलेले होते. डॉ. नारळीकर हे जिज्ञासू होते, प्रतिभावंत होते. शेवटपर्यंत कोणताही आजार त्यांना जडला नव्हता हे वैशिष्ट्या. पुणे येथील आपल्या निवासस्थानी मंगळवारी पहाटे वयाच्या 86 वषी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ‘आकाशाशी जडले नाते’ हे त्यांचे गाजलेले विज्ञानक्षेत्राचे पुस्तक. त्यांच्या निधनाने आज खगोलशास्त्राच्या नभांगणातील शुक्रतारा निखळला. त्यांच्या एवढे प्रगल्भ पद्धतीचे संशोधन क्वचितच कोणी केले असावे. त्यामुळेच त्यांच्या निधनाने साहित्य आणि विज्ञानक्षेत्राचे अतोनात नुकसान झालेले आहे. ही पोकळी भरून काढणे फार कठीण आहे. तसेच त्यांनी या क्षेत्रासाठी दिलेले योगदान आणि सर्वसामान्य जनतेला समजावे अशा साध्या सोप्या पद्धतीने विज्ञान आणि खगोलशास्त्राचा जो प्रचार आणि प्रसार केला त्यांचे हे कार्य अविस्मरणीय आणि अतुलनीय असेच आहे. 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूर येथे रँग्लर प्राध्यापक विष्णू वासुदेव नारळीकर व आई सुमती यांच्या पोटी जन्मलेल्या ह्या व्यक्तीने आपल्या वडिलांकडून दीक्षा घेतली. वाराणसी येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी बनारस विद्यापीठातून विज्ञानक्षेत्राची पदवी संपादन केली आणि ती देखील ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण ठरले. तिथून ते कँब्रिज विद्यापीठात गेले आणि त्या विद्यापीठाची गणिताची ट्रायपास परीक्षा उत्तीर्ण करून रँग्लर ही पदवी संपादन केली. त्याचबरोबर पीएचडी पदवी देखील त्यांनी संपादन केली. त्यांनी खगोलशास्त्रामध्ये केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळेच आंतरराष्ट्रीय खगोल संघाच्या कॉस्मोलॉजी विभागाचे ते अध्यक्ष होते. केवळ खगोलशास्त्राचा अभ्यासच करून ते राहिले नाहीत तर त्यांनी विपुल अशी ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यामुळे साहित्य क्षेत्रामध्ये देखील त्यांचे फार मोठे योगदान हे वाखाणण्याजोगे होते. अनेक विज्ञानकथा त्यांनी लिहिल्या आणि त्याला वाचक वर्गाने देखील उस्फूर्त असा प्रतिसाद त्याकाळी दिला होता. ‘आकाशाशी जडले नाते’, ‘अंतराळातील भस्मासुर’, ‘वामन परत न आला’ ‘चार नगरातले माझे विश्व’ या त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला साहित्य अकादमीच्या पुरस्काराने भरारी आली. ‘व्हायरस’ सारखी अनेक अभ्यासपूर्ण पुस्तके त्यांची प्रसिद्ध झालेली होती. जागतिक पातळीवर स्वत:चा वेगळा असा ठसा उमटविणारा हा मराठी माणूस, त्याने सर फ्रेड होईल यांच्यासमवेत कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थीअरी मांडून जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले होते. अंतराळ आणि विज्ञान, सूर्याचा प्रकोप, अंतराळातील स्फोट, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव अशा अनेक पुस्तकांच्या निर्मितीमुळे डॉ. जयंत नारळीकर हे मराठी साहित्यक्षेत्रात अत्यंत लोकप्रिय बनले. खगोल क्षेत्रामध्ये केलेली बहुमूल्य अशी कामगिरी आणि त्यासाठीचे योगदान विचारात घेऊन भारत सरकारने या प्रगल्भ अशा विज्ञान संशोधकाला ‘पद्मभूषण’ आणि त्यानंतर ‘पद्मविभूषण’ हा सर्वोच्च सन्मानही बहाल केला होता. जयंत नारळीकर यांची अनेक व्याख्याने देशभरात झालेली आहेत. त्यांचे व्याख्यान हे नेहमीच सचित्र असायचे. त्यासाठी समोर एक स्क्रीन लावलेली असायची आणि त्यावर ते खगोलशास्त्रातील वेगवेगळे प्रसंग किंवा तारे ग्रह इत्यादींची सचित्र माहिती द्यायचे. भारतीय नभांगणातील हा एक तेजस्वी तारा निखळलेला आहे. आपण खगोलशास्त्राला किती गंभीरपणे घेतो याचा विचार नेहमीच करणे आवश्यक आहे. आपण पंचांग पाहतो, ज्योतिषशास्त्रात पारंगत असलेल्याकडे जाऊन आपले भविष्य समजावून घेतो. सारे काही सूर्य चंद्र तारे ग्रह याच्यावर भविष्याचे कोष्टक मांडले जाते, मात्र खगोलशास्त्राकडे आपण साफ दुर्लक्ष करतो. खगोलशास्त्रामुळेच आज फार मोठी प्रगती आपण पाहतो आहोत. डॉ. जयंत नारळीकर हे आगळेवेगळे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या पश्चात त्यांनी केलेले कार्य हे मागे राहिलेले आहे. भारतीय खगोलशास्त्र संशोधनात त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आणि खगोलशास्त्राला जास्त लोकप्रिय ठरविण्यासाठी अथक प्रयत्न केले. सारा भारत एका अतुलनीय कामगिरी करणाऱ्या खगोल शास्त्रज्ञाला मुकलेला आहे.
Previous Articleआयपीएल : अहमदाबादमध्ये अंतिम लढत
Next Article पावसाचा दणका
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








