वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादने आशियाई क्रिकेट मंडळावर (एसीसी) टीका केली आहे. सध्या सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील रविवारी लंकेत होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोर टप्प्यातील सामन्यासाठी एसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. दरम्यान या स्पर्धेतील होणाऱ्या इतर सामन्यामध्ये एसीसीकडून अशी तरतूद करण्यात आली नाही. एसीसीच्या या दुजाभाव प्रवृत्तीबद्दल व्यंकटेश प्रसादने नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. येथील हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविली आहे. या सामन्यावेळी पावसाचा अडथळा आल्यास हा सामना सोमवारी 11 सप्टेंबरला पुन्हा खेळविला जाईल. सुपर फोरमध्ये भारताचा पुढील सामना यजमान लंकेबरोबर 12 सप्टेंबरला होणार आहे. कोलंबोमध्ये पुढील आठवड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याने स्पर्धा आयोजिकांनी कोलंबोतील सामने हंबनटोटा येथे हलविण्याबाबत योजना आखली आहे.









