► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे माजी उपराष्ट्रपती आणि माजी केंद्रीय मंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांची निवड ‘गांधी शांतता पुरस्कार’ निवड समितीचे सदस्य म्हणून करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नावाला शनिवारी मान्यता दिली. त्यानंतर त्यांचे नाव निवड समितीचे सदस्य म्हणून निश्चित झाले. हा पुरस्कार 1995 पासून प्रतिवर्ष दिला जातो. असामान्य कामगिरी केलेल्या व्यक्तींना तो दिला जातो. या पुरस्काराच्या निवड समितीचे अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी राष्ट्रीयत्व, वंश, भाषा, जात, धर्म किंवा कोणत्याही अन्य बाबीचा संबंध येत नाही.









