वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील वडखोल भागातील काही नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत शिवसेना पक्षाचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांचेकडे केलेल्या सुचनेनुसार मुख्याधिकाऱ्यांनी तेथील वस्तुस्थितीची पाहणी केली. तेथील समस्या जाणून घेऊन प्राप्त झालेल्या निधीनुसार वस्तुस्थितीची पहाणी केली. तेथील कामे करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून वडखोल वासियांचा हा अनेक वर्षाच रेंगाळलेला प्रश्न काम मार्गी लागणार असल्याचे शिवसेना शहर प्रमुख उमेश येरम यांनी स्पष्ट केले.
वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील वडखोल भागातील काही नागरिकांच्या विविध समस्या असल्यामुळे त्यांनी त्या समस्या आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख उमेश येरम यांच्याकडे मागणी केली होती. सदर मागणीस अनुसरून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परीतोष कंकाळ यांना या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी उपाय योजना काय करता येईल त्यादृष्टीने घटनास्थळी भेट देवून पहाणी करण्याची सुचना केली होती. गुरुवारी मुख्याधिकारी परीतोष कंकाळ यांनी उमेश पेरम यांचेसह निशाण तलावाखालील विहिरीजवळ जावून भेट देत पाहणी करण्यात आलेली आहे.
यावेळी वडखोल येथील नागरिकांनी निशाण तलावामधून वाहून जाणारे ज्यादा पाणी नाल्यातून पुढे जावून समुद्राला जाते. निशाण तलावाची उंची वाढवण्याच्या पुर्वी सदरचे पाणी पाटाद्वारे येथील नारळाच्या बागायतीसाठी वापरण्यात येत होते. परंतु तलावाची उंची वाढविताना सदरचे पाट खराब झालेले असल्याने बागायतीसाठी पाणी मिळत नाही. यावर मुख्याधिकारी परीतोष कंकाळ यांनी सदरच्या ठिकाणी कोल्हापुरी पध्दतीचा बंधारा घालून पाणी साठवून उरलेले पाणी नाल्यात न सोडता येथील शेतकरी यांचे असलेल्या पाटाला सोडण्यासाठीच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करणेच्या सुचना दिलेल्या आहेत. निधी मंजूर झालेनंतर काम करता येवू शकणार आहे.त्यानंतर वडखोल येथील शाळेजवळ मुख्याधिकारी आणि नगरपरिषदेचे इतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष उमेश येरम यांच्या समवेत चर्चा करण्यात आली. यावेळी प्रथम येथील नागरीकांनी मुख्याधिकारी, शिवसेना पक्षाचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम आणि नगरपरिषद कर्मचारी यांना पुष्पगुच्छ देण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लवकरात लवकरच निधी मिळवून कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वेंगुर्ले शहर शिवसेना प्रमुख उमेश येरम यांनी सांगितले. तदनंतर ग्रामस्थांनी सर्वाचे आभार मानले.यावेळी वडखोल येथील ग्रामस्थ प्रभाकर पडते, उत्तम परब, चंद्रकांत परब. रवी परब, आनंद परब, अनंत परब, बाबू कोळेकर, निवृत्ती आरमारकर, राजेंद्र पालव व इतर नागरिक उपस्थित होते.









