स्टॉलच्या अर्जांसाठी विक्रेत्यांची झुंबड : भरमसाठ शुल्कामुळे स्टॉलपासून वंचित,शुल्क रोखीनेच भरायला सांगितल्याने संशय
पणजी : राजधानी पणजी शहरात मांडवीतीरी गुऊवारपासून भरणाऱ्या पारंपरिक अष्टमीच्या फेरीत दुकाने थाटण्यासाठी मनपाने चक्क 27,500 ऊपये शुल्क भरण्यास सांगितल्यामुळे विक्रेत्यांनी संताप व्यक्त केला असून हा निधी खरोखरच मनपा तिजोरीत जातो की परस्पर ’गपापा’ होतो, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. संतापाची बाब म्हणजे शुल्काची रक्कम रोखीनेच भरण्याची सक्ती केल्यामुळे या विक्रेत्यांचा संशय बळावला आहे. मनपाच्या इतिहासात अष्टमी फेरीसाठी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शुल्क आकारण्यात आले असून तेवढी रोख खिशात नसल्यामुळे अनेकांना हिरमुसले होऊन परतावे लागल्याचे सांगण्यात आले. ही फेरी उद्या दि. 7 पासून भरणार असली तरी त्यात दुकाने थाटण्यासाठी इच्छुकांनी गेल्या तीन दिवसांपासून मनपासमोर ठाण मांडले होते. त्यांच्या झुंबडीमुळे या परिसराला चक्क जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र मनपाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात फी आकारण्यात येईल, याची आम्ही कल्पनाच केली नव्हती. अन्यथा पैशांची व्यवस्था केली असती, आता अंतिम क्षणी कुठून पैसे आणणार असा सवाल, येथून रिक्त हस्ते परतणाऱ्या काही विक्रेत्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
पोलिसांकडून सौम्य लाठीमार
मनपाने केवळ 410 स्टॉल्स थाटण्यासाठी व्यवस्था केलेली असली तरी त्यासाठीचे अर्ज मिळविण्यासाठी दुप्पटीने इच्छुक तीन दिवसांपासून या परिसरात जमा झाले होते. मात्र शेवटच्या क्षणी त्यांना, ’पूर्ण रक्कम रोख स्वऊपात भरण्याची तयारी असेल तरच आत प्रवेश देण्यात येईल’, असे सांगण्यात आल्यामुळे सर्वांची निराशा झाली. या प्रकारास विरोध करून काही विक्रेत्यांनी तेथील अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घातली असता पोलिसांनी सौम्य लाठीमारही केल्याची कैफियत त्यांनी मांडली.
ऊ. 5,500 वरून थेट 27,500 शुल्क!
दुकाने मिळविण्यासाठी आलेले बहुतेकजण हे येथील पारंपरिक व्यापारी होते. एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 18 वर्षांपासून ती दरवर्षी येथे दुकान थाटत होती. एवढ्या वर्षात आपण कधीच अशी भरमसाठ फी भरली नव्हती. गतवर्षी सुद्धा आपण केवळ 5500 ऊपये भरले होते. यंदाही तेवढीच फी असेल या अंदाजाने पैशांची व्यवस्था केली होती, असे ती म्हणाली. गतवर्षीच्या फी ची पावतीही तिने यावेळी पत्रकारांना दाखविली.
अन्य कुठेच एवढे शुल्क नाही
आम्ही केवळ पणजीतच फेरीसाठी येत नाही. वास्को, मडगाव, यासारख्या शहरांमध्येही वेळोवेळी भरणाऱ्या फेरीत दुकाने थाटतो. परंतु कोणत्याही पालिकेने अशी बक्कळ फी मागितली नाही, असे अन्य एका विक्रेत्याने सांगितले. अर्ज नेण्यासाठी आलेल्या अन्य विक्रेत्यांमध्ये मुंबई, दिल्ली, आदी शहरातून आलेल्यांचाही समावेश होता. दरम्यान, या फेरीत अनेक गोमंतकीय विक्रेतेही स्टॉल लावतात. परंतु यंदा त्यांच्यावरही अन्याय झाल्याचे समजले आहे. त्यामुळे मनपाने शुल्कवाढीच्या निर्णयावर फेरविचार करावा व आमच्यावर झालेला अन्याय दूर करावा, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे.
मनपाची मनमानी गोमंतकीयांच्या मुळावर : मडकईकर
मनपाने चालविलेली ही मनमानी गोमंतकीय विक्रेत्यांच्या मुळावर उठल्याचा आरोप नगरसेवक उदय मडकईकर यांनी केला आहे. भरमसाठ शुल्कामुळे एकाही गोमंतकीयाने स्टॉल थाटण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे यंदा या फेरीत एकही गोमंतकीय दिसणार नाही, असे मडकईकर म्हणाले. अनेक गोमंतकीय परंपरेने याठिकाणी स्टॉल थाटत होते. त्यासाठीची उत्पादने तयार करण्यासाठी त्यांनी वर्षभर मेहनत घेतलेली असते. परंतु मनपाच्या फसवेगिरीमुळे यंदा त्यांच्यावर निराश होण्याची वेळ आणली आहे, अशाप्रकारे कुठलीही पूर्वकल्पना न देता किंवा मनपा बैठकीत निर्णय सुद्धा न घेता अचानक 5 हजारांवरून 27 हजार ऊपये शुल्क वाढविणे हे कृत्यच बेकायदा व अन्यायकारक आहे, असे मडकईकर म्हणाले. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करून गोमंतकीय विक्रेत्यांना गतवर्षीच्याच दराने फी आकारून स्टॉल द्यावे, अशे मागणीही मडकईकर यांनी केली आहे.









