वार्ताहर /झुआरीनगर
सध्या उकाडा भरपूर वाढलेला आहे. त्यामुळे बहुतेक किनाऱयावर लोकांची गर्दी दिसून येते. पण वेलसांवचा समुद्रकिनारा याला अपवाद आहे. रविवार व सुट्टीचा दिवस सोडल्यास या किनाऱयावर कुणीच फिरकत नाही.
साधनसुविधा अभावी तसेच इतर विविध समस्यामुळे पर्यटक या किनाऱयावर येत नाहीत. परंतु निरव शांतता व सामसूस असलेला हा समुद्र किनारा गैरकृत्ये व प्रेमीयुगलासाठी सोयीचा ठरत आहे. या समुद्रकिनाऱयावर जास्त कुणी येत नसल्याचा फायदा घेऊन काही दिवसापूर्वी या किनाऱयावर एका मुलीचा खून झाला होता. यापूर्वीही अशा काही घटनांमुळे हा समुद्र किनारा चर्चेत राहिलेला आहे. वेलसांवच्या या समुद्राला मोठी किनारपट्टी लाभलेली आहे. किनारी भाग माड तसेच इतर समुद्री झाडांनी वेढलेला आहे. परंतु पावसात या समुद्र किनाऱयाची मोठय़ा प्रमाणात धुप होत असते. परिणामी किनारी भागाची झाडेही कोसळत असतात. यासाठी वेळीच उपाययोजना न केल्य़ास समुद्र किनारा नष्ट होण्याची भीती आहे.
माजी आमदार एलिना साल्ढाणा यांनी या समुद्र किनाऱयावर प्रवेश करणाऱया भागावर बसण्यासाठी वर्तुळाकार कठडा तसेच पायऱया बसवून सौंदर्यीकरण केले होते. परंतु सध्या किनाऱयाची धूप होऊन हा कठडाही कोसळलेला आहे. या समुद्र किनाऱयावर वेलसांवचे स्थानिक मच्छीमार आपला व्यवसाय करतात. सध्या त्य़ांचीही कामे बंद असल्याने किनाऱयवर स्मशान शांतता दिसून येते. एकेकाळी पिकनिकसाठी हा किनारा सोयीचा मानला जायचा. आसपासच्या गावचे लोक आपल्या कुटुंबासहीत या किनाऱयावर सहलीसाठी यायचे. परंतु सध्या स्थानिकच सायंकाळी किनाऱयावर फिरताना दिसतात.
किनाऱयाची मोठय़ा प्रमाणात होणारी धूप हा चिंतेचा विषय आहे. यासाठी आपण पुढाकार घेऊन किनारपट्टीवर झाडे लावण्याचे काम केले. आणखीन काही उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे वेलसांवचे सरपंच हेनरीक रिबेलो यांनी सांगितले. किनाऱयावर होत असलेल्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस गस्त सुरू केलेली आहे. पण हे पोलिसही किती आणि कुठवर लक्ष देणार अशी चिंता सरपंच रिबेलो यांनी व्यक्त केली. पर्यटन खात्यार्फे किनाऱयावर साफसफाई केली ही चांगली गोष्ट आहे. किनाऱयावर येणाऱया लोकांकडून जास्त कचरा होत नसला तरी समुद्राच्या लाटांबरोबर येणाऱया कचऱयामुळेच या किनाऱयावर अस्वच्छता पसरत असल्याचे डिमेलो यांनी सांगितले. वेलसांवच्या समुद्रकिनाऱयाची धूप होऊन तो उद्वस्त होऊ नये यासाठी तातडीने काही उपाययोजना करण्याची गरज आहे.









