मात्र कारण अद्याप अस्पष्ट : आज मिळणार निकालपत्र, वेलिंगकर आज उच्च न्यायालयात अर्ज करणार
पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल हिंदू रक्षा महाआघाडीचे गोवा राज्य समन्वयक, हिंदूवादी नेते प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज काल सोमवारी दुपारी उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. बॉस्को रॉबर्ट यांनी नाकारला. संध्याकाळी 5 वाजता जाहीर होणार असलेला निकाल न्यायाधीशांनी रात्री उशिरा 9 वाजता न्यायालयात येऊन तोंडी जाहीर केला, मात्र त्यात कोणतेही कारण देण्यात आलेले नसल्याने वेलिंगकर यांच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या या निवाड्यानंतर वेलिंगकर यांच्याकडे आता उच्च न्यायालयात धाव घेण्याचा पर्याय असून आज मंगळवारी ते उच्च न्यायालयात अर्ज करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. वेलिंगकर यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी दुपारी सुनावणी सुरू झाली. यात ‘आप’ चे आमदार क्रूझ सिल्वा, माजी मंत्री चर्चिल आलेमाव, वोरेन आलेमाव आणि झिना परेरा या चारजणांच्या हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या.
अटकेची शक्यता नाही
सरकारी वकील दर्शन गावस यांनी आपल्या युक्तिवादात वेलिंगकर यांना दोनवेळा पोलिसांनी नोटीस पाठवूनही त्यांनी तपास अधिकाऱ्यांसमोर येण्याचे टाळले असल्याचे सांगितले. भारतीय घटनेनुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला बोलण्याचे स्वातंत्र्य असले तरी त्यावर काही प्रमाणात बंधने घालण्यात आलेली आहेत. वेलिंगकर यांनी विस्फोटक विधाने करून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रसंग आणून ठेवला आहे. त्यात ते गायब झाल्याने काही धर्मियांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यांनी केलेला अपराध हा जामीनपात्र असल्याने त्यांनी कायद्यासमोर उभे राहून जामिनासाठी अर्ज करणे संयुक्तिक ठरले असते. त्यांच्याकडून पोलिसांना काही साहित्य अथवा कागदपत्रे ताब्यात घेण्याची जऊरी नसल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले.
निकालपत्र मिळणार मंगळवारी
सर्व वकिलांनी दुपारी 1 वाजेपर्यंत आपले युक्तिवाद पूर्ण केले. त्यानंतर न्या. रॉबर्ट यांनी निकाल संध्याकाळी 5 वाजता जाहीर केला जाणार असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी रात्री 9 वाजता न्यायालयात येऊन निकाल तोंडी जाहीर केला, मात्र कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. निकालपत्र मंगळवारी देण्यात येणार आहे.
लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न
वेलिंगकर यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील सरेश लोटलीकर यांनी बाजू मांडली. ते म्हणाले की, वेलिंगकर यांनी आताच नव्याने हे विधान केले नसून याआधीही केले आहे. राज्यात होत असलेले घोटाळे आणि अराजकता यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी या विधानाला राजकीय रंग देण्यात आला आहे.
वेलिंगकरांनी गुन्हा नव्हे, सूचना केली
वेलिंगकर यांनी कोणताही गुन्हा केलेला नसून त्यांनी केलेली ती केवळ एक सूचना आहे. ही लोकशाही की झुंडशाही हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वेलिंगकरांकडून पत्रकाराच्या मताचा पुनरुच्चार
वेलिंगकर पोलिसस्थानकात हजर राहण्याचा धोका पत्करू शकत नाहीत. लोकांच्या मागणीनुसार त्यांना पोलिस अटक करण्याची शक्यता आहे. संत फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल त्यांनी नव्हे तर एका श्रीलंकन पत्रकाराने आधी हेच मत व्यक्त केले होते. त्यांनी फक्त त्याचा पुनऊच्चार केला आहे. वेलिंगकर यांची पोलिस तपासाला सहाय्य करण्याची पूर्ण तयारी असून त्यांची पोलिसांसमोर येण्याची तयारी आहे, मात्र त्यांना अटक करू नये, अशी विनंती लोटलीकर यांनी केली. पणजीत सकाळी कडक उन्ह पडले होते, मात्र संध्याकाळ होताच आभाळ अचानक काळ्या ढगांनी भरून आले आणि जोरदार वारे वाहून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आल्तिनो येथे जिल्हा सत्र न्यायालयात वेलिंगकर यांच्यावरील महत्त्वाचा निकाल ऐकण्यासाठी दिवसभर उघड्यावर झाडाखाली उभ्या असलेल्या मीडिया प्रतिनिधींची पावसामुळे तारांबळ उडाली. काहींनी हा निसर्गाचा चमत्कार मानून निकालाबाबतीत साशंकता व्यक्त केली. वेलिंगकर यांचा सोमवारी वाढदिवस असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चांगली बातमी मिळण्याबाबत आशा निर्माण झाली होती. मात्र, निकाल समजल्यावर अनेक चाहते निराश होऊन परत गेले.
मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने विधाने करावीत : पालेकर
फादर बिस्मार्क यांचे विधान हे अपमानजनक नव्हते. त्यांनी शिवाजी महाराजांना देव नव्हे तर हिरो म्हणून संबोधले होते. तर दुसऱ्या बाजूने वेलिंगकर यांनी झेवियरच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह मांडले होते. हे दोन्ही विषय वेगळे असून आता हा वाद मुद्दामहून धार्मिक हिंसा पसरवण्यासाठी चिघळवण्याचा प्रयत्न होत आहे. याविषयी आम्हा राजकारण्यांनीही आपले स्पष्ट मत लोकांसमोर मांडणे गरजेचे आहे. याबाबतीत मुख्यमंत्री यांचे विधान चुकीचे आहे. त्यांनी वेलिंगकर यांचे आणि फा. बिस्मार्क यांनी केलेले विधान समान असून त्यांना समान न्याय दिला जाणार असल्याचे म्हटले आहे. ते कायद्याचा अभ्यास न करता बोलत आहेत. त्यांनी एकदा नव्या भारतीय न्याय संहिता कायद्याचा आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यातील कलमांचा अभ्यास करावा. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने आणि विचारपूर्वक विधाने करावीत, असे मत आपचे अध्यक्ष अमित पालेकर यांनी व्यक्त केले आहे.
प्रा. सुभाष वेलिंगकरांवर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव
सेंट झेवियर यांच्यावर टीका टिप्पणी केल्याने आणि ख्रिस्ती नागरिकांनी जोरदार आंदोलन केल्याने चर्चेत आलेले प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर यांच्या वाढदिवसानिमित्त काल सोमवारी त्यांच्यावर हजारो नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव कऊन त्यांचे जोरदार समर्थन केले. वेलिंगकर यांनी काल सोमवारी आपल्या वयाची 76 वर्षे पूर्ण कऊन 77 व्या वर्षात पदार्पण केले. त्यांच्या चिरंजीवानी सोशल मीडियावऊन ‘बाबा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! कंटकाकीर्ण मार्गावरचे आपले ध्येयप्रेरित जीवन अधिक तेजोमय होऊ दे!’ असे निवेदन केले.. अनेकांनी त्यावर हजारो प्रतिक्रिया पाठविल्या तसेच असंख्य नागरिकांनी स्वतंत्रपणे समाज माध्यमांवऊन वेलिंगकर यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. वेलिंगकर हे एक मोठी ताकद म्हणून आता वर येऊ लागले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील वेलिंगकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. समाजातील विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींनी सुभाष वेलिंगकर यांना शुभेच्छा देऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे. अनेकांनी ‘आय एम वेलिंगकर’ असे संदेश स्वत:च्या व्हॉट्सअप स्टेटसवर तसेच फेसबुकवर अपलोड केले आहेत. मात्र सुभाष वेलिंगकर हे नेमके कुठे आहेत हे समजू शकले नाही. त्यांनीही समाजमाध्यमांतून कोणत्याही प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत.
मिकी पाशेकेंच्या वाढल्या अडचणी
प्रा. सुभाष वेलिंगकर हे पोलिसांना सापडत नसल्याने, आपण त्यांचा शोध घेतो आणि ते जर सापडले तर त्यांच्या डोक्यात गोळ्या घालून जीवंत मारतो, असे धक्कादायक वक्तव्य माजी आमदार मिकी पाशेको यांनी पोलिस उपअधीक्षक नीलेश राणे यांच्या समक्ष केले होते. याप्रकरणी कोलवा पोलिसांनी मिकी पाशेको यांची काल जबानी नोंद करून घेतली आहे. मिकी पाशेको यांच्या विरोधात फातोर्डा पोलिसस्थानकात तक्रार नोंद करण्यात आली असून त्यांना आज मंगळवारी फातोर्डा पोलिसस्थानकात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे मिकी पाशेको यांच्या अडचणी वाढल्या आहेत.