एस. पी. ऑफिस रोडवरील चित्र, कारवाईची मागणी
बेळगाव : कोल्हापूर सर्कल ते एस. पी. ऑफिसपर्यंतच्या रस्त्याशेजारी असणाऱ्या पदपथावर दुचाकी वाहनांचे पार्किंग करण्यात येत आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी असणाऱ्या पदपथावर वाहने लावण्यात आल्याने नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे पदपथावर वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. एस. पी. ऑफिसपासून कोल्हापूर सर्कलपर्यंत अनेक कार्यालये व मोठी आस्थापने असल्यामुळे नागरिकांचे येणे-जाणे असते. वाहने लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने पदपथावर दुचाकी वाहने पार्किंग केली जात आहेत. काहीवेळा तर चारचाकी वाहनेही लावण्याचे प्रकार होत असल्यामुळे चालत जाणाऱ्या नागरिकांनी कोठून जायचे? असा प्रश्न निर्माण होत आहे. अपार्टमेंट त्याचबरोबर कमर्शियल कॉम्प्लेक्स परिसरात वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. परंतु, काही कॉम्प्लेक्समध्ये पार्किंगच्या जागेत व्यवसाय थाटले आहेत. यामुळे रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग करावे लागते. कोल्हापूर, पुणे, मुंबईमार्गे बेळगावमध्ये येणाऱ्या नागरिकांना याचमार्गे शहरात यावे लागते. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पदपथावर वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.









