मध्यप्रदेशातील घटना ः सुदैवाने जीवितहानी टळली
खरगोन / वृत्तसंस्था
मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला असतानाच उत्साही पर्यटकांना रविवारी पुराचा फटका बसला. खरगोन जिह्यातील बरवाह जवळ काटकूट नदीला आलेल्या महापुरात 13 आलिशान गाडय़ा बुडाल्या. यातील तीन गाडय़ा वाहून पुढे गेल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी अडवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अचानक आलेल्या पुरात 13 आलिशान गाडय़ा अडकल्या. त्यानंतर बचावासाठी आपले सर्व साहित्य टाकून पर्यटकांना पळ काढावा लागला.
प्रत्यक्षात नदीतील पाणी कमी असताना इंदूरमधील काही पर्यटक किनाऱयावर सहलीसाठी गेले होते. नदीपात्रात पुलाखाली त्यांचे जेवण सुरू असतानाच अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढली. अचानक आलेल्या पुरामुळे त्यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. सर्वांनी आपापले सामान नदीत टाकून पळ काढला. त्यांच्या गाडय़ा आणि सामान पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. रविवारी दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. गावकऱयांनी या लोकांना मदत केली. ट्रक्टर आणि दोरीच्या साहाय्याने नदीत अडकलेल्या गाडय़ा बाहेर काढण्यात आल्या.









