आंध्रातील दुर्घटनेत 15 कोटींचे नुकसान
वृत्तसंस्था /विजयवाडा
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे गुऊवारी एका बाईक शोरूमला लागलेल्या भीषण आगीत 400 हून अधिक दुचाकी जळून खाक झाल्या. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शॉर्टसर्किटमुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. काही इलेक्ट्रिक दुचाकी चार्ज होत असताना शॉर्ट सर्किट झाल्याचा संशय आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शोरूम मालकाचे 15 कोटी ऊपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. चेन्नई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गाजवळील केपी नगर भागात टीव्हीएस शोरूम आणि गोडाऊनला गुऊवारी सकाळी आग लागली. शोरूम, गोदाम आणि सर्व्हिस सेंटर एकाच ठिकाणी असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात दुचाकी उभ्या होत्या. विजयवाडा आणि युनायटेड कृष्णा जिह्यातील टीव्हीएस वाहनांसाठी हे मुख्य केंद्र होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोरूमच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्यानंतर काही वेळातच शेजारील गोडाऊनमध्ये पसरली.
गोदामात इलेक्ट्रिक दुचाकीही असल्याने आग वेगाने पसरली. प्री-पॅब्रिकेटेड स्ट्रक्चरमुळे आग काही मिनिटातच आजुबाजुला फैलावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाला माहिती देताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले असून काही गाड्या आगीच्या विळख्यातून सुटल्या आहेत.अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले तेव्हा शोरूम परिसरात आग आणि धुराचे लोट दिसून येत होते. आम्ही दीड तासात आग आटोक्मयात आणली. आगीचे नेमके कारण शोधले जात आहे. आगीत 400 ते 500 वाहने जळून खाक झाली असल्याचे जिल्हा अग्निशमन अधिकारी सुनकराव यांनी सांगितले.









