मारुतीने विक्रीत केला विक्रम : ह्युंडाई, महिंद्रा, टोयोटाच्या विक्रीत समाधान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी मारुती सुझुकीने मागच्या ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक कार विक्री करण्यामध्ये यश मिळवले आहे. यासोबत ह्युंडाई, महिंद्रा आणि महिंद्रा आणि टोयोटा यांच्या वाहन विक्रीतही समाधान दिसून आले आहे.
मारुती सुझुकी कंपनीने गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये 1 लाख 89 हजार 82 कारची विक्री करण्यात यश मिळवले आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी आकडेवारी असल्याचेही म्हटले जात आहे. मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये 1 लाख 65 हजार 173 कार्सची विक्री झाली होती. त्या तुलनेत पाहता या वेळेला 14 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. एकूण देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री 1 लाख 56 हजार 114 इतकी राहिली आहे. ही विक्रीदेखील मागच्या वर्षाच्या समान महिन्याच्या तुलनेमध्ये 16 टक्के अधिक आहे. कंपनीच्या मिनी प्रकारांमध्ये आल्टो आणि एक्सप्रेसो यांच्या विक्रीत मात्र मागच्या महिन्यात घट दिसून आली. या दोन्ही गाड्यांची विक्री 12 हजार 209 इतकी झाली आहे. हीच विक्री मागच्या वर्षी समान महिन्यात 22 हजारहून अधिक होती. बलेनो, सेलेरिओ, डिझाइर, इग्नीस आणि स्विफ्ट यांच्या विक्रीत मात्र वाढ झाली आहे. या गाड्यांची विक्री ऑगस्ट महिन्यामध्ये 72451 राहिली आहे. ब्रिझा, ग्रँड विटारा. जिम्नी, इर्टिगा व एक्सएल 6 यांची विक्री 58,746 इतकी राहिली आहे.
महिंद्राच्या एसयुव्ही कार्सना मागणीत वाढ
ऑटोमोबाईल क्षेत्रातील आणखीन एक कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा यांच्या कार विक्रीमध्येदेखील लक्षणीय वाढ दिसली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये एसयूव्ही गटातील कारची विक्री 37,270 इतकी नोंदली गेली आहे. एसयुव्ही गटातील कारची विक्री ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मानली जात आहे. एकंदर वाहन विक्रीमध्ये एसयुव्ही गटातील कारचा वाटा 19 टक्के इतका नोंदला गेला आहे. एक्सयूव्ही-700 आणि नव्या स्कॉर्पिअन यासारख्या कार्सना ग्राहकांचा प्रतिसाद चांगला लाभत आहे. कंपनीने एसयूव्ही गटात 38 हजार 164 कारची निर्यात करण्यामध्ये यश मिळवले आहे. देशांतर्गत व्यावसायिक वाहनांची विक्री 23 हजार 613 नोंदली गेली आहे.
टोयोटानेही विक्रीमध्ये ऑगस्ट महिन्यात 53 टक्के इतकी लक्षणीय वाढ नोंदवली आहे. कंपनीच्या 22,910 कार्सची विक्री मागच्या महिन्यात झाली आहे. या आधीच्या वर्षात समान महिन्यामध्ये 14959 वाहनांची विक्री झाली होती. ऑगस्ट 2023 मध्ये कंपनीने 20970 कार्सची विक्री देशांतर्गत पातळीवर केली आहे.
ह्युंडाईच्या विक्रीत 15 टक्के वाढ
ह्युंडाई मोटरनेदेखील आपली ऑगस्ट महिन्यातील कार विक्रीची आकडेवारी जाहीर केली असून ऑगस्टमध्ये 15 टक्के इतकी वार्षिक स्तरावर विक्रीत वाढ नोंदली आहे. ह्युंडाई मोटरने ऑगस्ट महिन्यात 71,435 कार्सची विक्री केली आहे. देशांतर्गत कार विक्री जवळपास 9 टक्के वाढून 53,830 कारची विक्री करण्यात कंपनीला यश आले आहे. मागच्या वर्षी याच महिन्यामध्ये देशांतर्गत कार विक्रीची संख्या 49,510 इतकी होती. दुसरीकडे ह्युंडाई मोटरने निर्यातीमध्येही जवळपास 39 टक्के वाढ नोंदवली आहे. 12,700 इतक्या वाहनांची निर्यात मागच्या वर्षी याच महिन्यात करण्यात आली होती. त्या तुलनेमध्ये मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये 17605 वाहनांची निर्यात केली गेली आहे.