कार आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीत घट
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
जुलै 2025 या महिन्यामध्ये ऑटो (वाहन) क्षेत्रामध्ये किरकोळ विक्रीत 4 टक्क्यांनी घट झाली. या कालावधीत एकूण 19,64,213 युनिट्सची विक्री झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 4 टक्के कमी आहे. गेल्या वर्षी विक्री 20,52,759 युनिट्स इतकी होती. प्रवासी वाहने आणि दुचाकी वाहनांच्या विक्रीतही घट झाली आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये विक्री जास्त होती. ही माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा)ने दिली आहे. फाडाच्या आकडेवारीनुसार, जुलै 2025 मध्ये प्रवासी वाहन विक्री 3,28,613 युनिट्स आहे, जी गेल्या वर्षी 3,31,280 युनिट्स होती. त्यामुळे, प्रवासी वाहनांच्या विक्रीत थोडीशी घट झाली असल्याची माहिती आहे.
दुचाकी विक्रीत 6 टक्क्यांनी घट
दुचाकी वाहनांच्या विक्रीत 6 टक्क्यांनी घट झाली आहे. ही विक्री 13,55,504 युनिट्स होती.
व्यावसायिक वाहन विक्रीत वाढ
गेल्या महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत थोडीशी वाढ झाली आहे. जुलै 2025 मध्ये व्यावसायिक वाहनांची विक्री 76,439 युनिट्स होती, जी गेल्या वर्षी 76,261 युनिट्स होती. तसेच, ट्रॅक्टर विक्रीबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या काळात विक्री 88,722 युनिट्स होती.









