चिपळूण :
गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या दरात दरदिवशी वाढ होताना दिसत आहे. त्यातच त्यावर लागणारा जीएसटी, मजुरी याचा विचार करता सोने खरेदी सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेली आहे. याचा फटका रविवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर झालेल्या खरेदी- विक्री व्यवहाराला बसला. दरवर्षीचा विचार करता केवळ 50 टक्के खरेदी झाली. आगामी लग्नसराईचा विचार करता कमी वजनाची मंगळसूत्रे घेण्यात ग्राहकांनी धन्यता मानली. कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदीकडेही पाठ फिरवली. मात्र वाहने खरेदीचा वेग अधिक असल्याचे दिसून आले.
मागील काही वर्षाचा विचार करता दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होत होती. त्यावेळी दर आवाक्यात होता. मात्र मागील तीन वर्षांपासून सोने-चांदीच्या दरात दर दिवशी मोठी वाढ होताना दिसत आहे. रविवारी गुढीपाडव्याला सोन्याचा दर कमी होईल, अशी आशा ग्राहकांना होती. मात्र तसे न होता उलट दरात वाढ झाली. रविवारी 22 कॅरेट सोन्याचा दर प्रती तोळा 83 हजार 500 होता. जीएसटी व मजुरी धरून 92 हजारावर गेला. चोख सोन्याचा दर पतोळा 89 हजार इतका होता. त्यामुळे सकाळपासून सोन्याच्या दुकानांमध्ये हाताच्या बोटांवर मोजावेत इतकेच ग्राहक दिसत होते. मात्रंकाळी काहीअंशी गर्दी झाली.
आगामी लग्नसराईचा विचार करता गमंगळसूत्र खरेदीला प्राधान्य दिले. मात्र ते खरेदी करताना कमीत-कमी वजनाचे घेण्याला पसंती दिली. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत 50 टक्केच सोने खरेदी झाल्याची माहिती काही व्यापाऱ्यांकडून मिळाली.
- बाजारपेठेत तितकीशी गर्दी नाही
गेल्या महिनाभराचा विचार करता बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. याला बरीच कारणे आहेत. गुढीपाडवा व रमजान ईद यामुळे दोन दिवस बाजारपेठेत काहीशी गर्दी दिसून आली. मात्र तरीही कपड्यांसह मोबाईल, टिव्ही, फ्रीज आदी साहित्यालाही तितकीशी मागणी नव्हती. उन्हाळ्याचा विचार करता काही प्रमाणात एसी व कुलर खरेदी करण्यात आले.








