सुदैवाने प्रवासी किरकोळ जखमी : चिखले-बेटणे मार्गावरील दुर्घटना
वार्ताहर/कणकुंबी
बेळगाव-चोर्ला रस्त्याचे डांबरीकरण झाल्यापासून विशेषत: चारचाकी किंवा सहाचाकी वाहनांच्या अपघातात वाढ झालेली आहे. सोमवारी चिखले ते बेटणे दरम्यान दोन ठिकाणी वाहनावरील चालकांचा ताबा सुटून एक वाहन गटारात तर दुसरे वाहन 20 फूट रस्ता सोडून जंगलात गेल्याची घटना जांबोटी-कणकुंबी मार्गावर घडली. पूर्वीचा खड्डेमय रस्ता बरा परंतु आता डांबरीकरण केलेला रस्ता नको, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करू लागले आहेत. कारण गोव्याहून किंवा बेळगावहून ये-जा करणारी चारचाकी तसेच टिप्पर, टेम्पो अशाप्रकारची वाहने भरधाव ये-जा करतात. अशावेळी रस्त्यालगत असलेले गाव किंवा शाळा याचा कुठलाही विचार न करता सुसाट वाहने चालवतात.
तसेच जांबोटी ते चोर्ला दरम्यानच्या रस्त्यावर अनेक धोकादायक वळणे असूनदेखील वाहनधारक बेभानपणे वाहन चालवतात. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. सोमवारी गोव्याकडून बेळगावकडे जाणारी एम. एच. 43 एक्यू 8055 हे इनोव्हा वाहन बेटणेनजीकच्या वळणावर आली असता, वाहनचालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट 20 फूट आत रस्ता सोडून जंगलात घुसली. सदर वाहनाच्या समोरील बाजूचा दरवाजा तुटून पडल्याने वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच वाहनांतील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अशाच पद्धतीने या मार्गावर दररोज अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. यासाठी ज्या ठिकाणी गाव किंवा शाळा असेल त्या ठिकाणी स्पीडब्रेकर घालून वाहनाच्या वेगावर प्रतिबंध घालावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









