वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर 1 हजार वाहनांची तपासणी : 500 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
गुरुवारी सायंकाळी बेळगाव पोलिसांनी वाहन तपासणीसाठी विशेष मोहीम राबविली आहे. शहरातील बारा प्रमुख ठिकाणी 1 हजारांहून अधिक दुचाकी अडवून तपासणी करण्यात आली. विनाहेल्मेट, ट्रिपल सीट, सदोष नंबर प्लेट असणाऱया 500 दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या पुढाकारातून ही कारवाई करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत संपूर्ण शहरात वाहनांची तपासणी करण्यात आली.
वाहतूक पोलिसांबरोबरच नागरी पोलिसांनाही यासाठी जुंपण्यात आले होते. उपलब्ध माहितीनुसार ट्रिपल सीट दुचाकी चालविणाऱया अधिकाधिक दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे.
यापुढेही वारंवार अचानक वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. सदोष नंबरप्लेटविरुद्ध यापूर्वीही अनेकवेळा कारवाई करण्यात आली आहे. वारंवार सूचना, इशारा देऊनही फॅन्सी नंबरप्लेटचे फॅड कमी होत नाही. हेल्मेटसक्ती असूनही हेल्मेटचा वापर केला जात नाही. त्यामुळे कारवाईची सूचना वरि÷ांनी दिली आहे.
जागृतीवर भर : पी. व्ही. स्नेहा
गुरुवारी सायंकाळी वाहनांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. वाहनचालकांवर कारवाई करण्यापेक्षा जागृती करण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. 2019 मध्ये 511 अपघात झाले आहेत. यामध्ये 54 जण दगावले. 2020 मध्ये 57 अपघात झाले आहेत. तर 62 जणांचा मृत्यू झाला आहे. 2021 मध्ये 27 अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. हेल्मेट परिधान न करणे, ट्रिपल सीट रायडिंग आदी कारणे आहेत. त्यामुळेच वाहनचालकांमध्ये जागृतीचा एक भाग म्हणून ही मोहीम राबविण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी सांगितले.









