वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा सपाटा
बेळगाव : वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा सपाटा सुरूच ठेवण्यात आला आहे. यासंबंधीचे कायदेही कडक आहेत. 18 वर्षांखालील अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देणेही महागात पडते. गुरुवारी असाच एक प्रकार घडला आहे. अल्पवयीन मुलाच्या हातात वाहन देणाऱ्या पालकांना तब्बल 25 हजार रुपयांचा जबर दंडही भरावा लागला आहे. 18 वर्षाखालील मुलांच्या हाती वाहने देताना पालकांना विचार करावा लागणार आहे. कारण न्यायालयात पालकांनाच मोठ्या दंडाला सामोरे जावे लागते. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 वर्षे 10 महिने वयाच्या मुलाच्या हाती दुचाकी देणाऱ्या पालकांना न्यायालयात मोठी दंडाची रक्कम भरावी लागली आहे.
सध्या सर्वत्र वाहनांची तपासणी वाढविण्यात आली आहे. वाहतूक विभागाचे एसीपी गंगाधर बी. एम., दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील वेगवेगळ्या भागात रोज तपासणी केली जात आहे. दि. 12 सप्टेंबर रोजी दुपारी गोगटे सर्कलजवळ एक दुचाकी अडवून संबंधितांना कागदपत्रांची विचारणा करण्यात आली. वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक अभिषेक नाडगौडा यांनी मोटारसायकल चालविणाऱ्या मुलाकडे लायसेन्सची विचारणा केली. त्यावेळी त्याच्याजवळ लायसेन्स नाही, तो 18 वर्षाखालील असल्याचे आढळून आले. त्वरित त्याच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना नोटीस देण्यात आली. गुरुवारी न्यायालयात 25 हजार रुपये दंडाची रक्कम पालकांना भरावी लागली.
अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊ नका…
अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देऊ नयेत, असे आवाहन पोलीस उपायुक्तांनी केले आहे. सर्वत्र तपासणी केली जाणार आहे. जर आपल्या मुलांबाबत अप्रिय घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी पालकांवरच असणार आहे. त्यामुळे पालकांनी लायसेन्स असल्याशिवाय व पाल्य सज्ञान असल्याशिवाय वाहने त्यांच्या हाती देऊ नयेत, असे आवाहनही पी. व्ही. स्नेहा यांनी केले आहे.









