ठिकठिकाणी रस्त्यावर मातीचे ढिगारे टाकण्यात आल्याने वाहनधारकांची होतेय डोकेदुखी
प्रतिनिधी / बेळगाव
अखेर वडगाव रस्त्यावर पेव्हर्स बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून रस्त्यावरील वाहने अडविण्यासाठी ठिकठिकाणी मातीचे ढिगारे घालण्यात आले आहेत. मात्र ढिगारे हटविले नसल्यामुळे चारचाकी वाहन अडकून पडण्याचा प्रकार गुरुवारी दुपारी घडला. काही केल्या चारचाकी वाहन हालत नसल्याने धक्का मारून बाहेर काढण्याचे परिश्रम नागरिकांना घ्यावे लागले.
शहरातील विविध रस्त्यांचा विकास स्मार्ट सिटी आणि अन्य निधीतून केला जात आहे. वडगाव रस्त्यांच्या विकासाचे घोंगडे गेल्या वर्षभरापासून भिजत पडले आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्यामुळे रस्त्याचा विकास करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मागीलवर्षी या रस्त्यावर चिपिंग व माती घालून दुरुस्ती केली होती. पण पावसाळ्यात सर्व माती व चिपिंग वाहून गेल्याने मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते. संपूर्ण पावसाळ्यात वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यावरूनच ये-जा करावी लागली. वडगावसह अनगोळ, आनंदनगर, येळ्ळूर, नंदिहळ्ळी, राजहंसगड अशा विविध भागातील वाहनधारक या रस्त्यावरून ये-जा करीत असतात. त्यामुळे हा रस्ता खूपच वर्दळीचा आहे. महापालिका प्रशासनाला याची माहिती असूनदेखील दुरुस्तीकडे कानाडोळा केला होता. अलीकडेच या रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले असून कित्येक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर रस्त्यावर पेव्हर्स घालण्यात येत आहेत.
पेव्हर्स घालताना संपर्क रस्त्यावरील वाहतूक अडविण्यासाठी मातीचे उंच ढिगारे घालण्यात आले होते. येळ्ळूर रोडवर आनंदनगर कॉर्नर येथे मातीचा ढिगारा घालून वाहने वळविण्यात आली होती. मात्र पेव्हर्स घालण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याने येळ्ळूर रोडवरून वाहनांची ये-जा सुरू झाली आहे. मात्र घातलेले मातीचे ढिगारे अद्यापही हटविले नाहीत.
अशा प्रकारची घटना रात्री-अपरात्री घडल्यास जबाबदार कोण?
वडगाववरून येळ्ळूरकडे जाणारी एक कार मातीच्या ढिगाऱ्यावर अडकली. गुरुवारी दुपारच्या दरम्यान ही घटना घडली. तर मातीचा ढिगारा वाहनाच्या चेस्सीला मध्यभागी लागल्याने वाहन मागे व पुढेही सरकत नव्हते. मातीच्या ढिगाऱ्यावर वाहन अडकल्याने समोरील चाकांना ग्रीप मिळत नव्हती. या वाहनाची चाके फिरून इतकी गरम झाली की, चाकांमधून धूर येऊ लागला. तसेच अन्य वाहनांना ये-जा करण्यास रस्ता नसल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. अखेर येथील नागरिकांनी धक्का मारून वाहन बाहेर काढले. अशा प्रकारची घटना रात्री-अपरात्री घडल्यास जबाबदार कोण? असा सूर उमटू लागला. प्रशासनाने तसेच कंत्राटदाराने वाहनधारकांची गैरसोय लक्षात घेऊन रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे व ठिकठिकाणी असलेले अडथळे दूर करावेत, अशी मागणी होत आहे.









