काश्मिरी कहवा, दार्जिलिंग चहा, भरडधान्ययुक्त खाद्यपदार्थांचा समावेश
जी -20 परिषदेसाठी नवी दिल्ली येथे आलेल्या विदेशी अतिथींच्या सन्मानार्थ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिनरचे आयोजन केले होते. या मेजवानीच्या मेन्यूमध्ये भारतीय शाकाहारी खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला होता. मेन्यूवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असे नमूद करण्यात आले होते. मेन्यूला भारतीय परंपरा, रीति-रिवाज आणि वैविध्य विचारात घेत तयार करण्यात आले होते. डिनरचा मेन्यू वसुधैव कुटुंबकम, एक पृथ्वी, एक परिवार, एक भविष्य या भावनेला समर्पित करण्यात आला होता. मेन्यूमध्ये काश्मिरी कहवा, दार्जिलिंगचा चहा, मुंबई पाव, अंजीर-आडू मुरब्बा समवेत देशातील अनेक खाद्यपदार्थांना मेन्यूत स्थान देण्यात आले होते. मेन्यूमध्ये भरडधान्याने तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थही सामील करण्यात आले होते. डिनरच्या मेन्यूमध्ये बिहारमधील प्रसिद्ध लिट्टी-चोखाचा समावेश होता. विदेशी अतिथींना प्रथम पात्रम वाढण्यात आले होते. अशाच प्रकारे ‘वनवर्णम’ची चव विदेशी अतिथींना चाखता आली आहे.
या डिनर कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव एंटोनियो गुतेरेस, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन सामील झाले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, चीनचे पंतप्रधान ली कियांग, जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शुल्ज, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज यांनी यात भाग घेतला. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासोबत डिनर कार्यक्रमात सहभागी झाले. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे पत्नी योको किशिदा यांच्यासोबत डिनरमध्ये सामील झाले. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांनीही डिनरला हजेरी लावली.
डिनरसाठी भारत मंडपम येथे पोहोचलेल्या विदेशी अतिथींचे स्वागत नालंदा विद्यापीठाचे दृश्य असलेल्या पार्श्वभूमीवर करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नी अक्षता यांना नालंदा विद्यापीठाच्या इतिहासाबद्दल माहिती करून दिली.
या डिनरमध्ये विदेशी राष्ट्राध्यक्ष, शिष्टमंडळाचे सदस्य, तसेच भारतातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय तसेच राज्य मंत्र्यांसोबत सुमारे 300 जण सामील झाले.
मंत्र्यांनाही निमंत्रण
डिनरमध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि त्यांच्या पत्नी सुदेश धनखड देखील सामील झाल्या. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्यासोबत केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. यात राजनाथ सिंह, अमित शाह, नितिन गडकरी, निर्मला सीतारामन, नरेंद्र सिंह तोमर, एस. जयशंकर, अर्जुन मुंडा, स्मृती इराणी, पियूष गोयल, धमेंद्र प्रधान आणि प्रल्हाद जोशी यांचाही समावेश होता.
विदेशी अतिथींकरता कुठले खाद्यपदार्थ तयार करावेत याचा निर्णय आयोजक म्हणजेच राष्ट्रपती किंवा पंतप्रधान घेतात. विदेशी अतिथींचा मेन्यू तयार करण्यापूर्वी प्रोटोकॉल ऑफिसर अतिथींच्या कार्यालयाकडून त्यांच्या डायटरी हॅबिट्स कोणत्या आहेत, त्यांना कुठलीही वैद्यकीय समस्या आहे का किंवा त्यांना कुठले खाद्यपदार्थ आवडतात हे जाणून घेत असतो.









