नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज : एपीएमसीमधील प्रकार : महिलांच्या कारभाराला हवा चाप
बेळगाव : उकिरड्यावर फेकलेली भाजी सध्या काही ठिकाणी विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. एपीएमसीमध्ये गोव्याहून वापस येणारी खराब असलेली भाजी फेकून देण्यात येते. तीच भाजी विक्रीसाठी महिला घेवून जात असल्याचे निदर्शनास आले आहे. एपीएमसीमध्ये काही महिलांनी हा रोजचाच व्यावसाय सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. एपीएमसी परिसरात असणाऱ्या काही महिलांनी उकिरड्यावर फेकून देण्यात आलेली भाजी घेवून ती विक्रीसाठी गांधीनगर अथवा शहराच्या काही ठिकाणी विक्रीसाठी घेवून जातात. तीच भाजी नागरिकांना विकतात. मात्र खराब असलेली भाजी विकून त्यांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनीही आता सावध होवून खरेदी करण्याची गरज आहे.
एपीएमसी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
बेळगावहून गोव्याला भाजी, कांदा, बटाटा, टोमॅटो घेवून जातात. त्याच वाहनांतून काही खराब झालेली भाजी परत बेळगावला आणण्यात येते. ते वाहन बेळगाव एपीएमसी येथे आल्यानतंर खराब झालेली भाजी अथवा इतर साहित्य उरिकड्यावर फेकून देतात. त्यातील भाजी असो किंवा इतर साहित्य घेवून काही महिला ते विक्री करत असल्याची बाब सामोरी आली आहे. त्यामुळे हा प्रकार आता थांबविण्याची गरज व्यक्त होत आहे. एपीएमसी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे व हा प्रकार त्वरित थांबवून संबंधित महिलांना सूचना करावी, अशी मागणी होत आहे.









