सोले, वांगी, वाटाणा, लालभाजीला पसंती, तयार चटणी-भाकरीलाही मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
भोगी आणि मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. विशेषत: सोले, वांगी, वाटाणा, लालभाजी, कांदापात आदी भाज्यांची विक्री अधिक प्रमाणात झाली. शनिवारी आठवडी बाजारानिमित्त भाजीपाला तेजीत आल्याचे दिसून आले. विशेषत: मागील आठवड्यात 30 रुपये किलो असणारी वांगी 80 रुपयांवर पोहोचली आहेत. मात्र, भोगीच्या पार्श्वभूमीवर खरेदीला वेग आला होता.
रविवारी भोगी तर सोमवारी मकरसंक्रांत आहे. भोगीला वेगवेगळ्या भाज्यांना पसंती दिली जाते. त्यामुळे बाजारात शनिवारी वाटाणा, सोले, वांगी आणि लालभाजीची आवक वाढली होती. सोले 100 रुपये शेर, वांगी 80 रुपये किलो, वाटाणा 120 रुपये किलो, लालभाजी 10 रुपयांना एक पेंडी, कांदापात 20 रुपयांना चार पेंड्या असा दर होता. विशेषत: भोगीदिवशी पाच भाज्या केल्या जातात. त्यामुळे बाजारात भाज्यांची लगबग पहावयास मिळाली.
मागील आठवड्याच्या तुलनेत भाज्यांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागू लागली आहे. सर्वच भाज्यांचे दर वाढू लागले आहेत. वांगी, लालभाजी, दोडकी, कारली यासह पालेभाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे.
चटण्यांचीही खरेदी
भोगीसाठी बाजारात शेंगदाणे, काळे तीळ, खोबऱ्याची चटणी, तीळभाकरीला मागणी वाढली होती. विविध ठिकाणी चटण्यांची विक्री करण्यात आली होती. गृहिणींकडून विविध चटण्यांनाही पसंती देण्यात आली. मकरसंक्रांतीच्या सणासाठी विविध प्रकारच्या भाकऱ्या आणि चटण्यांना मागणी अधिक असते. त्यामुळे बाजारात भाकऱ्या आणि विविध प्रकारच्या चटण्याही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.









