शेपू, टोमॅटो, भेंडी दरात घट
प्रतिनिधी/ बेळगाव
पावसाअभावी यंदा भाजीपाला लागवडीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे भाजीपाला दरवाढीबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे. मात्र सद्यस्थितीत भाजीपाल्याचा दर स्थिर असल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र कांदा, लसूण आणि आल्याचे दर मात्र वाढताना दिसत आहेत. तर 100 रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो आता 30 रुपयांवर आला आहे. शिवाय इतर भाज्यांचे दर देखील स्थिर आहेत. विशेषत: भेंडी, शेपू, वांगी, बटाटा, कोबी, फ्लॉवर आदी भाज्या आवाक्यात असल्याचेही दिसत आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात कोबी 10 रुपये, फ्लॉवर 20 रुपये, शेवग्याच्या शेंगा 10 रुपये, कांदे 40 रु. किलो, बटाटा 30 रु. किलो, कोथिंबीर 5 रुपयाला एक पेंडी, भेंडी 40 रु. किलो, गाजर 60 रु. किलो, ढबू 40 रु. किलो, बिन्स 30 रु. किलो, वांगी 30 रु. किलो, टोमॅटो 30 रु. किलो, कारली 40 रु. किलो, ओलिमिरची 40 रु. किलो, मुळा 10 रुपयाला 6 नग, लाल भाजी 10 रुपयाला दोन पेंड्या, कांदापात 20 रुपयाला 5 ते 6 पेंड्या, पालक 10 रुपयाला 2 पेंड्या, मेथी 10 रुपयाला एक, कोथिंबीर 5 रुपयाला एक पेंडी, लिंबू 10 रुपयाला 7 नग असा दर आहे.
श्रावण मासाला प्रारंभ झाला असला तरी किरकोळ बाजारात भाजीपाल्याची खरेदी मंदावलेली पहायला मिळत आहे. श्रावण मासात मांसाहार वर्ज्य केला जातो. त्यामुळे भाजीपाल्याला मागणी अधिक असते. मात्र बाजारात भाजीपाल्याची मागणी थंडावलेली दिसत आहे. मात्र श्रावणात भाज्याचे विक्री वाढेल अशी अपेक्षा किरकोळ विक्रेत्यांना आहे.
दरवर्षी श्रावणात भाजीपाल्याला अधिक महत्त्व दिले जाते. व्रतवैकल्याच्या या महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामुळे फळ, फुलांबरोबर भाजीपाल्याची विक्री अधिक होते. मात्र सध्यातरी बाजारात भाजीपाला विक्री थंडावलेलीच दिसत आहे.
यंदाच्या खरिप हंगामात केवळ 35टक्के भाजीपाला लागवड झाला आहे. पावसाअभावी भाजीपाला लागवडीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे भविष्यात भाजीपाल्याचे उत्पादन कमी होऊन दरात मोठी वाढ होण्याची चिंता व्यक्त होऊ लागली आहे.









