राजेंद्र प्रसाद चौकातील बॅरिकेड्स हटवून रस्ता करण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील कचरा कॅन्टोन्मेंट हद्दीत आणि कॅन्टोन्मेंटमधील कचरा शहराच्या नाल्यात टाकण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. विशेषतः समादेवी गल्ली आणि केळकर बागेतील भाजी विपेते राजेंद्र प्रसाद चौकाशेजारी कचरा टाकत असल्याचे कॅन्टोन्मेंट अधिकाऱयांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या ठिकाणी कचरा टाकणाऱयांवर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार कॅन्टोन्मेंटने चालविला आहे.
कॅन्टोन्मेंट आणि महानगरपालिकेची हद्द संलग्न असल्याने कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिक कॅम्प परिसरातील नाल्यामध्ये कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे महापालिका हद्दीतील नागरिक राजेंद्र प्रसाद चौक आणि डेअरी फार्म रोडशेजारी कचरा टाकत असल्याचे कॅन्टोन्मेंट अधिकाऱयांना आढळून आले आहे. कॅन्टोन्मेंट आणि महानगरपालिकेची हद्द कॉलेज रोडपासून संपते व सुरू होते. पण समादेवी गल्ली आणि केळकर बागेतील भाजीविपेते व फळविपेते बेनन स्मिथ शाळेशेजारी कचरा टाकत आहेत. अनेकवेळा सूचना करूनही कचरा टाकण्याचे बंद झाले नाही. हा परिसर कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत येत असल्याने कॅन्टोन्मेंटकडून स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला होता. तरीदेखील दररोज कचरा टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती उपाययोजना राबवायची? असा मुद्दा कॅन्टोन्मेंट प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतो. त्यामुळे रस्त्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केली जाते. सार्वजनिक बांधकाम खात्याने राजेंद्र प्रसाद चौकात बेनन स्मिथ शाळेसमोर पादचाऱयांच्या सोयीसाठी बॅरिकेड्स घालून सुरक्षेची दक्षता घेतली होती. पण हे बॅरिकेड्स कचरा टाकणाऱयांसाठी सोयीचे बनले आहे. हा रस्ता अस्वच्छ राहत असल्याने पादचारी या रस्त्यावरून ये-जा करीत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचत आहेत.
महापालिका हद्दीतील व्यावसायिक, रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याचा आणि कॅन्टोन्मेंटची हद्द अशा तीन विभागांकडे हा परिसर येत असल्याने येथील कोणतीच कामे व्यवस्थित होत नाहीत. बॅरिकेड्स हटवून याठिकाणी पेव्हर्स घालून पादचाऱयांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्याचा विचार कॅन्टोन्मेंटने चालविला आहे. पण रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असल्याने विकासकामे राबविणे किंवा बॅरिकेड्स हटविणे अशक्मय आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यानेच बॅरिकेड्स हटवून रस्त्यावर पेव्हर्स घालणे आवश्यक आहे. तसेच कचरा टाकू नये, याकरिता महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज आहे. मात्र कॅन्टोन्मेंट, महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने राजेंद्र प्रसाद चौकातील समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱयांनी या समस्येचे निवारण त्वरित करावे, अशी मागणी होत आहे.









