► प्रतिनिधी/ बेळगाव
किरकोळ भाजीपाला बाजारात भाज्यांचे दर स्थिर झाले आहेत. गाजर, ओली मिर्ची, ढबू, भेंडी, दोडकी, कारली आदी भाज्या प्रति किलो 50 रुपयांच्या पुढे आहेत. तर इतर भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. मध्यंतरी मकर संक्रांतीसाठी भाज्यांचे दर भडकले होते. त्यानंतर पुन्हा भाज्यांचे दर पूर्वपदावर आले आहेत.
शनिवारच्या आठवडी बाजारात काकडी 50 रूपये किलो, कांदा 25 रु. किलो, बटाटा 30 रु. किलो, ढबू 80 रु. गाजर 50 रु., बिन्स 40 रु. किलो, ओली मिरची 60 रु. किलो, वांगी 40 रु. किलो, टोमॅटो 15 रु. किलो, भेंडी 60 रु., किलो, दोडकी 60 रु. किलो, कारली 60 रु. किलो, फ्लॉवर 20 रु. 1 नग, शेवग्याच्या शेंगा 20 रु., कोबी 20 रु. 1, कांदापात 20 रु. 5 पेंड्या, लालभाजी 20 रु. 4 पेंड्या, पालक 10 रु. 2 पेंड्या, मेथी 10 रु. एक पेंडी, कोथिंबीर 10 रु. पेंडी, असा दर आहे.
संक्रांतीदरम्यान भाज्यांच्या दरात वाढ झाली होती. मात्र पुन्हा भाज्यांचे दर पूर्व पदावर आले आहेत. रब्बी हंगामात लागवड केलेल्या भाजीपाल्याचे उत्पादन सुरू झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक वाढली आहे. परिणामी दरदेखील काहीसे कमी झाले आहेत.
खाद्य तेलाच्या किंमतीत घसरण
खाद्य तेलाच्या किंमतीत घसरण होवू लागली आहे. विशेषत: सूर्यफूल तेलाच्या किंमती प्रति किलो 20 रुपयाने कमी झाल्या आहेत. 15 किलो डब्यामागे 300 रुपयाने दर कमी झाला आहे. मागील काही दिवसांपासून खाद्य तेलांच्या किंमतीत वाढ झाली होती. आता सूर्यफूल आणि इतर तेलांच्या किंमती कमी होवू लागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
केळ्यांच्या दरात वाढ
मागील आठवड्यापासून केळ्यांच्या दरात वाढ झाली आहे. डझनामागे 5 ते 10 रुपये अधिक मोजावे लागत आहेत. त्यामुळे किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांना देखील चटका बसला आहे. केळ्यांच्या किंमती अचानक वाढल्याने विक्रीवर देखील परिणाम झाला आहे.









