प्रतिनिधी/ बेळगाव
मागील आठवड्यात मकर संक्रांतीनिमित्त भाज्यांचे वाढलेले दर पुन्हा स्थिर झाले आहेत. मागील आठवड्यात कांदापात, सोले, वाटाणा, वांगी, मेथी, गाजर आदी भाज्यांचे दर वाढले होते. मात्र आता पुन्हा ते पूर्वपदावर आले आहेत. सौंदत्ती यल्लम्मा यात्रेमुळे गावागावातून यल्लम्माला जाणाऱ्या भक्तांचा ओढा वाढला आहे. दरम्यान यल्लम्माहून आल्यानंतर गावातून यात्रा होत आहेत. त्यामुळे भाजीपाल्याला मागणी वाढली आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात गाजर 60 रु. किलो, बिन्स 50 रु. किलो, फ्लॉवर 20 रुपयाला एक, बटाटा 30 रु. किलो, ढबू 80 रु. किलो, घेवडा 80 रु. किलो, ओली मिरची 60 रु. किलो, वांगी 60 रु. किलो, टोमॅटो 15 रु. किलो, कोबी 20 रुपयाला एक, दोडकी 60 रु. किलो, कारली 60 रु. किलो, जवारी गवार 100 रु. किलो, काकडी 60 रु. किलो, मोठा वाटाणा 50 रु. किलो, भेंडी 60 रु. किलो, कांदे 25 रु. किलो, शेवग्याच्या शेंगा 20 रु. किलो, मेथी 10 रुपयाला एक पेंडी, पालक 10 रुपयाला दोन पेंड्या, लालभाजी 20 रुपयाला चार पेंड्या, कांदापात 20 रुपयाला पाच पेंड्या, पालक 20 रुपयाला दोन पेंड्या, शेपू 10 रुपयाला एक पेंडी, कोथिंबीर 10 रुपयाला एक पेंडी, दूधीभोपळा 20 रुपयाला एक असा दर आहे.
गाजर, बिन्स, वांगी, दोडकी, कारली, गवार, काकडी, वाटाणा, ढबू आदी भाज्या प्रति किलो 50 रुपयांच्या पुढे आहेत. तर मेथी, शेपू, आणि कोथिंबीरही स्थिर झाली आहे. काही भाज्यांचे दर पुन्हा वाढत आहेत. तर काही भाज्यांचे दर स्थिर असल्याचे दिसत आहे. शिवाय दुपारच्या वेळेत उन्हाच्या झळा वाढू लागल्याने लिंबू, कलिंगड व इतर फळे देखील दाखल होवू लागली आहेत. वाढत्या उन्हामुळे या फळांना मागणी वाढू लागली आहे.
धामणे, येळ्ळूर परिसरातील सोल्याना मागणी अधिक
हंगामानुसार बाजारात घेवडा, सोले, मेरुल्या दाखल झाल्या आहेत. या भाज्यांना देखील मागणी वाढली आहे. विशेषत: सोले 100 रुपयाला एक शेर अशी विक्री सुरू आहे. थंडीमुळे सोले उत्पादनाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे धामणे, येळ्ळूर व परिसरातून सोले दाखल होवू लागले आहेत.









