पंचनामा करून भरपाई मिळवून देण्याची मागणी
वार्ताहर/काकती
होनग्यात गेले दोन दिवस पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या भाजीपाला पिकात पाणी साचून नुकसान झाले आहे. या पावसामुळे बळीराजावर संकट कोसळले आहे. कृषी विभागाकडून पीक नुकसानीचा पंचनामा होऊन भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.काकती येथे सोमवारी 33.5 मि.मी. व मंगळवारी 57 मि. मी. पावसाची नोंद झाली. होनगा तलावानजीक असलेल्या 25 एकरातील कोबी, शेपू 5 एकर व मेथी 5 एकर जमिनीतील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून गेले तीन दिवस सर्व पिके पाण्याखाली गेली होती. पाण्याचा निचरा करूनही बांधावरून पाणी वाहत होते. सर्वसाधारण कोबी पिकाला एकरी 30 हजार रुपये तर शेपू व मेथी पिकाला एकरी 22 हजार रुपये उत्पादन खर्च आला. परिणामी अवकाळी पावसामुळे बळीराजावर अवकळा आली आहे. कृषी विभागाच्या काकती रयत केंद्राच्या अधिकाऱ्यांनी पीक नुकसानीचा सर्व्हे करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवावे, अशी मागणी होत आहे.









