प्रतिनिधी/ बेळगाव
उद्यमबाग येथील वेगा हेल्मेटच्या घरपट्टी घोटाळा प्रकरणाची शनिवारी महापालिका सभागृहात झालेल्या सर्वसाधारण बैठकीत घमासान चर्चा झाली. सकाळपासून दुपारपर्यंत वेगा हेल्मेट घरपट्टी घोटाळ्याची चर्चा सुरू होती. या प्रकरणाशी संबंधित बिल कलेक्टरपासून महसूल उपायुक्तांपर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. जेणेकरून घोटाळे करणाऱ्या अधिकाऱ्यांना लगाम बसेल. त्यामुळे हे प्रकरण चौकशीसाठी सोपविण्यात यावे, अशी मागणी सत्ताधारी गटाच्यावतीने करण्यात आली. त्यामुळे महापौर मंगेश पवार यांनी वेगा हेल्मेट घरपट्टी घोटाळा प्रकरण लोकायुक्तांकडे वर्ग करण्याची सूचना सभागृहात केली.
गेल्या काही महिन्यांपासून वेगा हेल्मेटच्या कथित घरपट्टी वसुली घोटाळ्याची चर्चा सुरू आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनीही आवाज उठविल्याने महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना बजावले. महापालिकेकडून घेतलेल्या परवानगी व्यतिरिक्त काही जागेत बांधकाम करण्यात आले आहे. त्याचबरोबर दोन पीआयडी क्रमांक देण्यात आले असून घरपट्टी वसुलीत तफावत आहे. तसेच संबंधित कंपनीकडून महापालिकेला कमी घरपट्टी भरली जाते. दरवर्षी 1 लाखाहून अधिक घरपट्टी भरली जात होती. मात्र प्रत्यक्षात त्यांच्याकडून महापालिकेला घरपट्टी स्वरुपात अधिक रक्कम भरणे गरजेचे आहे. घरपट्टी वसुली करण्यात व भरण्यात महापालिकेच्या महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी वेगा हेल्मेटच्या बांधकामाचे फेरमोजमाप करण्याचा आदेश बजावला होता.
सदर रक्कम भरण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे, असे सांगितल्यानंतर रक्कम वसुलीसाठी नोटीस बजावली जाईल, असे सांगण्यात आले. मात्र या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार अशी विचारणा करण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांवरदेखील कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे तत्कालिन बिल कलेक्टरपासून महसूल निरीक्षक, महसूल अधिकारी व महसूल उपायुक्तांना नोटीस दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सत्ताधारी गटाच्यावतीने सदर प्रकरण अधिक चौकशीसाठी लोकायुक्तांकडे सोपविले जावे, अशी मागणी करण्यात आली. पण लोकायुक्तांऐवजी खात्यांतर्गत चौकशी करावी, तसेच 7 कोटी रुपयांची रक्कम कशा पद्धतीने लवकरात लवकर वसूल होईल यासाठी प्रयत्न करावेत. लोकायुक्तांकडे तक्रार केल्यास हे प्रकरण पुन्हा काही वर्षांसाठी पुढे जाईल, असे आमदार राजू सेठ यांनी सूचित केले. मात्र सत्ताधारी गटनेते अॅड. हणमंत कोंगाली यांनी वेगा हेल्मेट घरपट्टी घोटाळा प्रकरण चौकशीसाठी लोकायुक्तांकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी लावू धरल्याने शेवटी महापौर मंगेश पवार यांनी त्या मागणीला मंजुरी दिली. त्यामुळे या प्रकरणाची लोकायुक्त चौकशी सुरू होणार आहे.
वेगा हल्मेटला 7 कोटी रुपयांचे चलन
त्यानुसार अधिकाऱ्यांनी फेरमोजमाप केले असता वाढीव बांधकाम करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी महापालिका आयुक्तांच्या न्यायालयात सुरू होती. सुनावणीवेळी वेगा हल्मेट व्यवस्थापनाचे म्हणणे ऐकून घेत मनपा आयुक्तांनी वेगा हल्मेटला 7 कोटी रुपयांचे चलन देऊन महापालिकेला सदर रक्कम भरण्याचा निर्णय दिला आहे. एका पीआयडीला सिंगल तर दुसऱ्या पीआयडीला डबल टॅक्स भरण्यास सांगण्यात आल्याचेही यावेळी बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले.









