मनपा आयुक्तांकडून लोकायुक्त पोलिसांशी पत्रव्यवहार, चौकशीकडे लक्ष
बेळगाव : उद्यमबाग येथील वेगा हेल्मेट करवसुली घोटाळ्याची चौकशी करण्यासंदर्भात मनपा आयुक्तांनी लोकायुक्तांना पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे या कथित करवसुली घोटाळ्याची आता लोकायुक्तांकडून चौकशी सुरू होणार आहे. वेगा हेल्मेटकडून महापालिकेचा कोट्यावधी रुपयांचा कर थकविण्यात आला आहे. त्याचबरोबर सदर कर काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून थकण्यासह त्यामध्ये गोलमाल झाला आहे, असा आरोप यापूर्वीच झालेल्या सर्वसाधारण बैठकांमध्ये केला जात होता. या प्रकरणामध्ये सामील असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी प्राथमिक चौकशी करून चौघांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
इतकेच नव्हे तर अंतर्गत चौकशी केल्यानंतर करवसुलीत घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले. महापालिकेचा कोट्यावधी रुपयांचा कर थकविण्यात आल्याने या प्रकरणाची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सभागृहात करण्यात आल्याने महापौर मंगेश पवार यांनी त्याला रुलिंग दिले. तेव्हापासून सदर प्रकरण लोकायुक्त पोलिसांकडे कधी सोपविले जाणार? याबाबत चर्चा सुरू होती. अखेर मनपा आयुक्तांनी कथित कर घोटाळा प्रकरण चौकशीसाठी लोकायुक्तांकडे वर्ग केले आहे. बुधवारी महापालिकेकडून लोकायुक्तांना पत्र मिळाले असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सांगितले. खरेतर स्थानिक पोलिसांनीच या प्रकरणाचा तपास करणे आवश्यक आहे. पण आपल्याकडे तक्रार आली असल्याने चौकशी हाती घेण्यात आली असल्याचे लोकायुक्तचे जिल्हा पोलीसप्रमुख हनुमंतराय यांनी सांगितले.









