वीरभद्रेश्वर जयंती कार्यक्रमात मठाधीशांचा निर्धार
बेळगाव : वीरशैव लिंगायत समाजाचा समावेश ओबीसीच्या यादीत करावा, अशी मागणी रविवारी महात्मा गांधी भवन येथे झालेल्या वीरभद्रेश्वर जयंती उत्सवात करण्यात आली. वीरशैव लिंगायत संघटन मंचच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आधी राणी कित्तूर चन्नम्मा चौकापासून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य स्वामीजी, शिरहट्टी येथील जगद्गुरु फकिरदिंगालेश्वर स्वामीजी, हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, विधानसभेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, आमदार महांतेश कौजलगी, विधान परिषद सदस्य हणमंत निराणी, माजी आमदार महादेवप्पा यादवाड, रत्नप्रभा बेल्लद, अशोक पुजारी, निवृत्त प्रादेशिक आयुक्त डॉ. एम. जी. हिरेमठ, मुरगोड येथील श्री मनिप्र नीलकंठ स्वामीजी, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप कंकणवाडी, सुभाष पाटील, राज्य अध्यक्ष उमेश बाळी आदींसह राज्यातील विविध भागातून आलेले मठाधीश व समाजाचे प्रमुख यांची उपस्थिती होती. वीरशैव लिंगायत समाजाचा समावेश ओबीसीत करावा, या मागणीची पूर्तता होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा ठराव करण्यात आला. वीरशैव आणि लिंगायत हे दोन्ही एकच आहेत. सध्याच्या राज्य सरकारमध्ये लिंगायत अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. ते अडचणीत आहेत, असे काँग्रेस नेते शामनूर शिवशंकरप्पा यांनी सांगितले आहे. ही गोष्ट गंभीर आहे. लिंगायत नेते व अधिकाऱ्यांना योग्य पदे देण्याची मागणीही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली.









